चित्रपट निर्माते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे चर्चा करून निर्णय घेऊ – उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेळे चिपळूण (प्रतिनिधी) : मनाचे श्लोक नावाचा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित होत असून राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपट निर्मिती करणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. कोट्यवधी समर्थ भक्त आणि श्रद्धेय हिंदूंच्या धार्मिक भावना यामुळे दुखावल्या असून सामाजिक आणि धार्मिक तणाव या चित्रपटामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय न्याय संहिता कलम २९९ नुसार हेतुपुरस्सर आणि द्वेषपूर्ण उद्देशाने धार्मिक भावना दुखावणे हा गंभीर गुन्हा असून या चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शक करण्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आज हिंदू जनजागृती समिती च्या वतीने निवेदन देताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेळे यांच्याकडे हिंदुत्वनिष्ठ यांनी केली. यावर आम्ही आजच वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे चर्चा करून तुम्हाला कळवतो, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मनाचे श्लोक या चित्रपटाच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेळे आणि प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेळे यांच्याशी चर्चा करताना, याआधी पी. के. यांसारखे अनेक चित्रपट आणि अलिकडे ‘खालीद का शिवाजी’ आणि आता ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटांच्या माध्यमातून बहुसंख्याक हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोचवण्याचा प्रकार वारंवार होत असून यातून समाजात प्रक्षोभक वातावरण निर्माण केले जात आहे, याला चित्रपट प्रमाणपत्र देणारी सेन्सॉर बोर्ड ही शासन यंत्रणा जबाबदार आहे. याबाबत एक अहवाल प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी यावेळी केली. या मागणीला प्रांताधिकारी आकाश लिगाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी होकार दर्शवला आहे. मनाचे श्लोक या चित्रपटाचे नाव न पालटल्यास तो प्रदर्शित होऊ देणार नाही असे यावेळी सांगण्यात आले.
निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे गुहागर विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे अमित जोशी, गोरक्षक विक्रम जोशी, शिवसेनेचे प्रशांत उतेकर, विहीपचे पराग ओक, सकल गुरव समाज संघटनेचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष उमेश गुरव, हिंदुत्वनिष्ठ राजेश ओतारी, केतन ढवळीकर , हिंदू जनजागृती समितीचे हेमंत चाळके, सनातन संस्थेचे केशव अष्टेकर, सौ. कविता अष्टेकर, महेश कात्रे, प्रल्हाद बांदेकर आदी उपस्थित होते.