नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संस्थेचे पालकमंत्र्यांकडे मागणी रत्नागिरीत सांस्कृतिक नमन भवन उभारण्यासाठी मागणी
चिपळूण (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातील वृद्ध आणि गरजू लोककलाकारांना अधिक आर्थिक मदत मिळावी, यासाठी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा या मातृसंस्थेने महत्वपूर्ण मागण्या शासनाकडे केल्या आहेत. प्रामुख्याने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी असलेला कलाकारांच्या मानधन मंजुरीचा इष्टांक (कोटा) १०० वरून ३०० पर्यंत वाढवण्याची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. रत्नागिरीत प्रमुख मागण्यांचे निवेदन नमन लोककला रत्नागिरी (मातृसंस्था) जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने नुकतेच पालकमंत्री सामंत यांच्याकडे सादर केले. तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही हे निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, जिल्ह्यात सांस्कृतिक नमन संस्थेचे ६२४ नमन मंडळे कार्यरत आहेत. त्या मंडळांशी जिल्ह्यात २५ हजार लोककलावंत या क्षेत्राशी जोडलेले आहेत. या सर्व कलावंतांच्या वतीने ही मागणी करण्यात आली. ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबवली जाते. या योजनेनुसार, ५० वर्षांवरील (दिव्यांगांसाठी ४०) आणि कला/साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे योगदान असलेल्या तसेच वार्षिक उत्पन्न ६० हजारपेक्षा जास्त नसलेल्या गरजू कलावंतांना दरमहा मानधन दिले जाते. त्यासाठी दिलेल्या निवेदनातील प्रमुख दोन मागण्यांमध्ये जिल्ह्यातील वृद्ध कलावंताना मानधन कोटा वाढवावा, अशी आहे. जिल्ह्यात कला व साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या वृद्ध कलाकारांची संख्या मोठी आहे. सध्या जिल्ह्यासाठी केवळ १०० कलाकारांना मानधन मंजूर करण्याचा कोटा आहे. हा कोटा वाढवून ३०० करावा, अशी प्रमुख मागणी आहे. जेणेकरून जिल्ल्ह्यातील अधिक गरजू वृद्ध कलावंतांना दरमहा ५ हजार रूपयांचे मानधन मिळू शकेल. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासनाच्या भूखंडावर ‘सांस्कृतिक नमन भवन’ उभारण्यात यावे, जेणेकरून जिल्ह्याच्या सांस्कृतिक व लोककला परंपरेला प्रोत्साहन मिळेल, अशीही मागणी आहे.
हे निवेदन देतेवेळी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर उर्फ पी. टी. कांबळे, मोहन घडशी, युयुत्सू आर्ते, संतोष कुळे, परशुराम मासये, विश्वनाथ गावडे यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. फोटो रत्नागिरी: पालकमंत्री उदय सामंत यांना नमन लोककला जिल्हा संस्थेच्यावतीने कलावंत मानधनवाढ, नमन भवन उभारण्याबाबत निवेदन देतेवेळी पी. टी. कांबळे. सोबत परशुराम मासये, संतोष कुळे आदी पदाधिकारी.