जिल्हापरिषद सहा पैकी पाच ठिकाणी महिला आरक्षण ; पंचायत समिती बारा पैकी सहा जागा महिला आरक्षित
मालवण | प्रतिनिधी : आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य आरक्षण सोडत काढण्यात आली. मालवण पंचायत समिती 12 जागांसाठी मालवण तहसीलदार कार्यालय येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. सहा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हापरिषद आरक्षण सोडत काढण्यात आली. यात मालवण तालुक्यातील सहा जागापैकी पाच जागा महिला आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे मालवण तालुक्यात ‘महिलांराज’ असेच चित्र आहे.
मालवण पंचायत समिती आरक्षण सोडत मालवण तहसीलदार कार्यालय येथे नियंत्रक अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) शारदा पोवार आणि तहसीलदार वर्षा झालटे यांच्या उपस्थितीत लहान मुलगी श्रीनिका निखिल नागवेकर यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.
*मालवण पंचायत समिती आरक्षण सोडत*
पेंडूर पंचायत समिती जागा अनुसूचित जाती (महिला) प्रवर्ग, कुंभारमाठ व कोळंब नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला, शिरवंडे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), वराड, पोईप व आडवली-मालडी सर्वसाधारण (खुले) महिला, चिंदर, आचरा, मसुरे-मर्डे, वायरी-भुतनाथ, सुकळवाड पस सर्वसाधारण (खुले) असे आरक्षण जाहीर करण्यात आले.
*जिल्हापरिषद मालवण तालुका आरक्षण*
सुकळवाड जिप अनुसूचित जाती महिला, आचरा, आडवली-मालडी, मसुरे आणि वायरी-भुतनाथ या चार जागा सर्वसाधारण (खुले) महिला तर पेंडूर सर्वसाधारण (खुले) असे आरक्षण जाहीर करण्यात आले.










