लांजा (प्रतिनिधी) लांजा नागरी सहकारी पतसंस्थेला सलग पाचव्यांदा राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लांजा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात लांजा नागरी पतसंस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेली ३४ वर्षे सभासद आणि ग्राहकांची प्रामाणिक आणि विनम्रपणे सेवा बजावत आहे. संस्थेला सतत अ ऑडीट वर्ग प्राप्त असून सीडी रेशोचे प्रमाण तसेच थकबाकीचे प्रमाण शासन निकषाप्रमाणे मर्यादित ठेवलेले आहे. संस्थेचे संपूर्ण व्यवहार संगणकीकृत असून संपूर्ण कामकाज ऑनलाइन पद्धतीने नेहमी सुरू आहे. संस्थेकडे एन एफ टी, आरटीजीएस, मनी ट्रान्सफर, एस.एम.एस. सुविधा चालू आहेत. तसेच संस्थेच्या भांबेड, सापुचेतळे, साटवली येथे शाखा सुरू असून सर्व शाखा नफ्यात आहेत.आज अखेर संस्थेच्या ठेवी जवळजवळ ३५ कोटी ३० लाख रक्कमेच्या आहेत.
संस्थेच्या एकूण ठेवी रुपये १० ते ५० कोटी पर्यंतच्या विभागात कोकण विभागातून हा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे.
अशाप्रकारे सलग पाचऱ्यांदा राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा कोकण विभागातून राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार पटकावून संस्थेने आपल्या नावलौकिकात भर घातली आहे. सहकारी चळवळीत पतसंस्थांच्या आव्हानात्मक काळात लांजा नागरी पतसंस्थेने सर्व सभासदांना व ग्राहकांना वेळोवेळी आवश्यक व विनम्र सेवा दिलेली आहे.वेळप्रसंगी ग्राहकांना घरपोच सेवा पुरवीत आहे.संस्धा दरवर्षी सभासदांना 11 टक्के पेक्षा जास्त लाभांश देत आहे.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन शिवाजी कोत्रे, व्हाईस चेअरमन रवींद्र पावसकर, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर रुमडे, सर्व कर्मचारी आणि सर्व पिग्मी व रिकरींग एजंट यांचा मोलाचा वाटा असून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









