मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

मंडणगड प्रतिनिधी:  रत्नागिरीचे पुन्नर्रवसन विभागाचे उप जिल्हाधिकारी मारुती बोरकर यांच्या निरिक्षणाखाली मंडणगड पंचायत समितीची आरक्षण प्रक्रीया शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 13 ऑक्टोंबर 2025 रोजी राबवण्यात आली. सार्वत्रीक निवडणुकासाठी निवडणुक आयोगाचे निर्देशाने लोकसंख्येचे प्रमाण व गटामध्ये पुर्वी लागू असलेले आरक्षण या बाबी लक्षात घेऊन शालेय विद्यार्थी अनस आकलाक माटवणकर (इयत्ता दुसरी) याच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत करण्यात आली. त्यानुसार मंडणगड तालुक्यातील चार गणाचे आरक्षण तहसिलदार अक्षय ढाकणे यांनी नागरीकांना पुर्ण प्रक्रीया समाजवून सांगत जाहीर केले.
13 ऑक्टोंबर 2025 रोजी जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे आहे. भिंगळोली पंचायत समिती गण सर्वसाधारण, इस्लामपूर पंचायत गण सर्वसाधारण महिला, तुळशी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला, बाणकोट पंचायत समिती गण नागरीकांचा मागास प्रवर्ग खुला, असल्याचे जाहीर करण्यात आले. याचबरोबर रत्नागिरी येथील सोडतीत मंडणगड तालुक्यातील भिंगळोली व बाणकोट हे दोन्ही जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षीत झाले आहे आहेत.
नियोजनाकरिता तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. पंचायत समितीचे (13) रोजी झालेल्या आरक्षणनुसार तुळशी व इस्लामपूर हे दोन गट सर्वसाधारण महिलेसाठी, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता बाणकोट तर भिंगळोली हा गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोडतीच्या कार्यक्रमास निवासी नायब तहसिलदार सुदर्शन खानविलकर, महसुल कर्मचारी सचिन गोवळकर, तलाठी मंदार गावकर, शैलेश सापटे हे कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती गणाचे गेल्या चार निवडणुकांचे आरक्षण, या संदर्भातील निकष व नियम यांचा अंदाज राजकीय पक्षांना आधीपासूनच असल्याने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व नागरीक यांची कार्यक्रम स्थळी उपस्थितीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले. निवडणुक आयोगाने या संदर्भात हरकती नोंद करण्यासाठी 13 ते 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंतचा कालावधी दिलेला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.