रोटरी स्कूल खेडमध्ये दिवाळी सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.

खेड – ( प्रतिनिधी )
मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्सव साजरा करत मनमुराद आनंद लुटला. सदरच्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने व प्रार्थनेने करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ. राधिका घोडे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्त्व सांगितले. तद्नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत मोरया मोरया, आली दिवाळी, दिन-दिन दिवाळी, ओवाळीते भाऊराया यांसारखी विविध दिवाळी सणावर आधारित गीते सादर करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी कंदील, विविध आकाराच्या पणत्या, कागदी रंगीबेरंगी चांदण्या, पताका तयार करून आपल्या वर्गाबरोबरच संपूर्ण शाळेचा परिसर सुशोभित केला. तसेच आपापल्या वर्गासमोर सुंदर अशा रांगोळ्या काढल्यामुळे दिवाळी सणाला एक वेगळाच साज चढला होता. सर्वात आकर्षणाची बाब म्हणजे पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भव्य किल्ला रचून दिवाळी उत्सव साजरा केला. तद्नंतर विद्यार्थ्यांनी फराळ खाऊन दिवाळी सण साजरा केला. यावेळी उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके आदी मान्यवर उपस्थित होते.