सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी कलाकारांची शुक्रवारी सभा

बांदा l प्रतिनिधी :सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील संगीत, वारकरी भजनी बुवा, पखवाज वादक, तबला वादक, किर्तनकार आणि अन्य क्षेत्रातील कलाकारांसाठी स्थापन झालेल्या भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या शासनमान्य संस्थेने महत्त्वपूर्ण बैठक आणि चर्चासत्राचे शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी आयोजन केले आहे. या निमित्ताने सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील सर्व भजनी कलाकारांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेला शासन दरबारी मान्यता मिळाल्यानंतर संस्थेचे कार्यकारी मंडळ आणि मान्यवर या क्षेत्रातील कलाकारांशी थेट भेटून चर्चा आणि विचार-विनिमय करून महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मळगाव ग्रामपंचायत येथील पेडणेकर सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

यात कलाकार मानधन, विमा योजना, कलाकार ओळखपत्र, भजन परंपरा संवर्धन व जतन, कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिर, इतर शासकीय योजनांचा कलाकारांना लाभ मिळवून देणे या विषयांवर शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. यावेळी भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, प्रेमानंद देसाई, नितीन भांडारकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर उपस्थित राहणार आहेत.

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील सर्व भजनी कलाकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.