सोनूर्ली माऊली देवीचा ६ नोव्हेंबर रोजी ‘लोटांगण जत्रोत्सव’ 

कार्तिक पौर्णिमेनंतरचा महासोहळा : हजारो भाविक फेडणार नवस

सावंतवाडी । प्रतिनिधी :श्रद्धा आणि भक्तीचा अनुपम संगम असलेल्या आणि दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून लौकिक प्राप्त असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली गावच्या श्री देवी सोनूर्ली माऊली देवीचा वार्षिक ‘लोटांगण जत्रोत्सव’ यंदा ६ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची जय्यत तयारी देवस्थान समिती आणि समस्त गावकरी मंडळींच्यावतीने सुरू झाली आहे.

*लोटांगण जत्रोत्सवाची आगळी परंपरा*

श्री देवी सोनूर्ली माऊलीचे हे जागृत देवस्थान नवसाला पावणारे दैवत म्हणून महाराष्ट्रभर ख्यातनाम आहे. त्यामुळे हा वार्षिक उत्सव केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, तो ‘लोटांगण जत्रोत्सव’ म्हणून विशेषत्वाने ओळखला जातो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक या दिवशी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी सोनूर्ली येथे अलोट गर्दी करतात.

 

*नवसपूर्तीचा अनोखा भक्तीसोहळा:*

जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोटांगण घालण्याची अनोखी भक्ती परंपरा. अनेक भक्तगण आपल्या मनोकामना आणि नवस पूर्ण झाल्यावर श्री देवी मंदिरात लोटांगण घालून आपला नवस फेडतात. हजारो भाविक ओल्या वस्त्रांनी, लोटांगण घालत मंदिरात प्रदक्षिणा पूर्ण करतात, ज्यामुळे त्यांच्या उत्कट श्रद्धेचे आणि देवीवरील अढळ विश्वासाचे दर्शन घडते. ही भक्तीची पराकाष्ठा पाहण्यासाठी भाविकांची मोठी मांदियाळी जमते.

कार्तिक पौर्णिमेनंतरचा शुभयोग:

दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा दुसऱ्या दिवशी हा भव्य सोहळा पार पडतो. यावर्षी ६ नोव्हेंबर रोजी हा जत्रोत्सव होणार आहे. लोटांगणाच्या भक्तीमय वातावरणाने आणि लाखो भक्तांच्या गर्दीने सोनूर्ली गाव या दिवशी अक्षरशः भारावून जाणार आहे.

या जत्रोत्सवात सहभागी होऊन श्री देवी सोनूर्ली माऊलीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.