चिपळूण मुर्तवडे येथील घटना
शेतात काम करणारे अन्य सहा जणही झाले जखमी
चिपळूण :
बुधवारी पडलेल्या पराफीच्या पावसाने मोठा घात केला असून
चिपळूण तालुक्यात मुर्तवडे येथे एका युवकाच्या अंगावर विज पडल्याने दुर्दैवीरित्या त्याचा मृत्यू झाला आहे. सुशील शिवराम पवार (वय 38) असं मृत्यू झालेल्या शेतकरी युवकाचे नाव आहे.
सुशील शिवराम पवार हे शेतात भात कापणी करत असताना वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. दोन पोती भाताची कापून आणल्यावर तिसरं पोतं जमा करत असतानाच अंगावर वीज कोसळली व त्यात तो गंभीरित्या जखमी झाला त्याला तातडीने डेरवण येथील वादावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.
सुशील याच्याबरोबर काम करणारे अन्य सहाजणही जखमी झाले होते. त्या सहाजणांची प्रकृती आता स्थिर आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेला सुशील हा शेतकरी होता, तसंच तो इलेक्ट्रिशनचही काम करत असे. सुशीलच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सुशील याच्या मृत्यूने साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याच पितृछत्र हरपल आहे. बुधवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
सुशील याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान भाऊ व सुशील याचा एक साडेतीन वर्षाचा चिमुकला असा परिवार आहे.या दुर्दैवी व धक्कादायक घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेल्या सुशील पवार यांच्यावर आज गुरुवारी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी मुर्तवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तसेच जखमी झालेल्या सहा जणांमध्ये उत्तम भिवा पवार वय 65, संतोष विठ्ठल कांबळे वय 55, संदीप लक्ष्मण पवार वय 52, सुलोचना कांबळे वय 65, सुजाता रामदास पवार 35, रोशन रामदास पवार वय 19 यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना रात्री उशिरा घरी सोडण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.












