कळसवलीत बंद घर फोडून अज्ञात चोरटयांनी दोन लाख विस हजाराचा ऐवज लांबविला वारंवार होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांनी जनेतमध्ये भितीचे वातावरण

राजापूर प्रतिनिधी: तालुक्यात कुंभवडे, नाणार परिसरात एका रात्रीत पाच घरफोड्या झाल्याची घटना ताजी असतानाच आता कळसवली येथील एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून वाढत्या चोऱ्यांमुळे जनेतमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान गेल्या दिड ते दोन महिन्यात वारंवार घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात पोलीसांनाही अद्याप यश न आल्याने पोलीसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळसवली, वाणीवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक शरद त्र्यंबक साखळकर हे दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी पत्नीसह पनवेल, सुखापुर येथे त्यांच्या मुलांकडे राहण्यासाठी गेले होते. त्यांनी घराला लॉक लावून त्यांनी घराची चावी ही त्यांचे शेजारी राहणारे मधुसुदन गोपाळ महाडदळकर यांचेकडे दिली होती. गुरूवार दि.16 ऑक्टोबर रोजी सकाळी कळसवली येथील त्यांया शेजारी राहणारे वैभव श्रीकांत ठाकुरदेसाई यांनी त्यांना फोन करुन घराचे पाठचे व पुढचे दोन्ही दरवाजे उघडे आहेत. तसेच घरातील सर्व सामान विस्कटलेले आहे व घरातील कपाट फोडलेले आहे, अशी माहिती दिली.

त्यानंतर श्री.साखळकर हे त्यांची पत्नी व मुलांसमवेत पनवेलहून त्यांच्या राहत्या घरी म्हणजे कळसवली येथे आले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील सुमारे 1 लाख रूपये किंमतीचे 40 वर्षापुर्वीचे एक सोन्याचे मंगळसुत्र, 1 लाख रूपये किंमताच्या 2 बांगड्या, 20 हजार रूपये किंमतो सोन्याचे व मोत्याचे कानातले, व 500 रूपये किमतीचे 2 निरंजण, 1 चांदीचे अगरबत्ती स्टॅन्ड, चांदीचे करंडे, असा सुमारे 2 लाख 20 हजार 500 रूपये किंमता मुद्देमाल चोरून नेला आहे. या पकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व पहाणी केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख करत आहेत.