शिवविचार आणि शिवप्रेरणेच्या जल्लोषात शिवजयंती उत्सव

हरहर महादेव..जय भवानी जय शिवाजी गर्जना आसमंतात घुमणार

चिपळूण (वार्ताहर) : शिवजयंती म्हणजे नवा उत्साह, नवी प्रेरणा, नवी ऊर्जा आणि शिवगर्जनेचा नवा जल्लोष असतो. असाच जल्लोष आज शिवजयंतीच्या दिनी खेडोपाड्यांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. शिवजयंती साजरी करण्याचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक गावात जयंतीचे आयोजन करून आपल्या जाणत्या राजाला सर्व नागरिक मानवंदना देण्यासाठी आणि मुजरा करण्यासाठी सज्ज असतात. सर्वत्र हरहर महादेव आणि जय भवानी.. जय शिवाजीची गर्जना ऐकायला मिळणार आहे.

ज्यानी रयतेचे स्वराज्य निर्माण केले, अठरा पगड समाजातील लोकांना एकत्र करून त्याच्या हातात लढण्यासाठी शस्त्र दिले, ज्याने प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये समता, न्याय, बंधुता या मूल्यांची ज्योत पेटवली, ज्यांनी आपल्या स्वराज्यात स्त्रियांच्या रक्षणासाठी कडक नियम केले, शेतकऱ्यांसाठी सुविधा दिल्या आणि खरी लोकशाहीची सुरुवात शिवशाहीमध्ये करून दिली अशा महान पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. सर्वत्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करून या दिवशी “हरहर महादेव आणि जय भवानी जय शिवाजी”… या गर्जनांचा जल्लोष पाहायला मिळतो. सर्वत्र भगवामय वातावरण बघायला मिळते.

आज प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात शिवजयंतीचे जल्लोष दिसत आहे . अगदी शालेय स्तरापासून खेड्यापाड्यांमध्ये ग्रामीण भागात शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळतो. शिवविचारांची शिदोरी घेऊन शिवजयंती उत्सव प्रत्येक संघटना प्रतिष्ठान आणि गाव पातळीवरती साजरी होत आहे. यातूनच शिवविचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेरला जात आहे आणि ही काळाची गरज आहे. इथल्या युवकांमध्ये आणि प्रत्येक व्यक्तींमध्ये शिवविचार त्यांचे कार्य मनात रुजवण्यासाठी शिवजयंती सोहळा निश्चितच एक मोठे कार्य म्हणता येईल.

चिपळूण तालुक्यात शहरात आणि ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंतीचे आयोजन होत आहे. बाईक रॅली , मिरवणुका शिवचरित्रावरील व्याख्याने आणि शालेय स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून हा शिवजयंती सोहळा साजरा केला जात आहे. या ही वर्षी चिपळूण तालुक्यामध्ये शिवजयंती साजरी होत आहे. आपल्या राजाची जयंती साजरी करताना प्रत्येक मावळा उस्फूर्तपणे यात सहभागी होत आहे. त्यांना मानवंदना देत आहे. ज्यावेळी प्रत्येक घराघरात शिवजयंती साजरी होईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने हा शिवचरित्रचा विचार त्यांच्या घरात आणि मनात पोहोचेल. त्यातूनच एक नवीन शिवक्रांती उदयास येईल हे चित्र आपल्याला पुढील काळात घडवायचा आहे. यासाठी शिवजयंती आणि शिवविचार पेरण्याचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.