खेड (प्रतिनिधी) : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड-दापोली परिसरात पक्षसंघटनेला नवी ताकद मिळाली आहे. खेड तालुक्यातील जामगे येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात उबाठा विभागातील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमात ८० हून अधिक कार्यकर्त्यांनी उबाठा संघटन सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या कार्यकर्त्यांमध्ये अडखळ, म्हैसोंडे वाडी, कोरे बुद्रुक या भागातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यांनी “शिवसेनेच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या पक्षासोबत आम्ही आहोत,” अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अण्णा कदम, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे, उबाठा अडखळ शाखा प्रमुख मनोज शिर्के, ग्रामपंचायत सदस्य वर्षा शिर्के, तसेच महिला आघाडीच्या प्रमुख सुषमा शिर्के, मनिषा शिर्के, सुजाता शिर्के, तन्वी शिर्के यांसह अनेक ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान संजय कदम यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “शिवसेना ही फक्त राजकीय संघटना नाही, तर जनतेच्या हितासाठी लढणारी चळवळ आहे. कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळेच दापोली-खेड परिसरात आज शिवसेना अधिक मजबूत होत आहे.” नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे दापोली व खेड तालुक्यातील शिवसेना संघटनेला नवे बळ मिळाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.











