खेड शहरातील ‘आपला बाजार’ला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट;

 पाहणी करून पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

खेड (प्रतिनिधी) – खेड शहरात नव्याने स्थलांतरित झालेल्या ‘आपला बाजार’ला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नुकतीच भेट देऊन सखोल पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण बाजाराची पाहणी करत व्यवस्थापन, उपलब्ध सुविधा तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती घेतली. स्थानिक नागरिकांना दर्जेदार वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत ‘आपला बाजार’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी खेड नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्ष माधवी बुटाला, गटनेते निकेतन पाटणे तसेच शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बाजार व्यवस्थापनाशी संवाद साधत शहराच्या विकासात अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले. स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या बाजारपेठा वाढल्या पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी ‘आपला बाजार’चे मालक संदीप नायकवडी यांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही ग्राहकाभिमुख सेवा देत बाजारपेठेचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शहराध्यक्ष कुंदन सातपुते, मीनार चिखले, संजय मोदी, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.