दापोली (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात रंग चढला असताना, गृहमंत्री योगेश कदम यांनी या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी मुंबईकरांच्या जीवनात काहीही बदल होणार नाही. पंचवीस वर्षे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असताना मराठी माणूस मात्र हळूहळू बाहेर फेकला गेला. त्यांनी सत्तेत असतानाही मराठी माणसासाठी ठोस निर्णय घेतला नाही.”
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे मिळूनही उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेच्या हिताचे एकही धोरण अमलात आणले नाही. मराठी माणसाच्या भावनांचा विचार करण्याऐवजी त्यांनी फक्त सत्तेचा उपभोग घेतला.”
या पार्श्वभूमीवर गृहमंत्री कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत म्हटले की, “फसवे आणि दिखाऊ राजकारण करणाऱ्या या नेत्यांवर मुंबईकर पुन्हा विश्वास ठेवणार नाहीत. मराठी माणूस आता जागा झाला आहे आणि तो विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देईल.”
कदम यांच्या या वक्तव्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.












