दापोली (विशेष प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी (२५ मार्च) सायंकाळी एक हृदयस्पर्शी घटना घडली. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास एक डॉल्फिन अचानक किनाऱ्यावर येऊन अडकला. समुद्रातील भरती-ओहोटीतील बदल किंवा दिशाभूल झाल्यामुळे हा सागरी जीव किनाऱ्यावर आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वेळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या काही तरुणांच्या लक्षात ही बाब आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने मदतकार्य सुरू केले. दाभोळ येथील बामणे मोहल्ल्यातील शाजेब बामणे, मुसाब बामणे, इबाद बामणे, निसार बामणे, अस्मान बामणे, सैफ बामणे आणि इनात हमदुले या तरुणांनी एकजुटीने आणि अत्यंत संयमाने प्रयत्न करत डॉल्फिनला अलगदपणे पुन्हा समुद्रात सोडले.
डॉल्फिन किनाऱ्यावर अडकले असताना त्याला कोणतीही इजा होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. तसेच गर्दी आणि गोंधळ टाळत शांततेत हे बचावकार्य पार पाडण्यात आले. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर डॉल्फिन सुरक्षितपणे खोल पाण्याकडे परत गेल्याचे पाहून उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले असून या तरुणांनी दाखवलेली तत्परता, धाडस आणि प्राणिमात्रांविषयीची संवेदनशीलता यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तज्ज्ञांच्या मते, डॉल्फिनसारखे सागरी जीव कधी कधी समुद्रातील बदल, जखम किंवा दिशाभूल यामुळे किनाऱ्याकडे येतात. अशा वेळी त्यांना कोणताही त्रास न देता सुरक्षितपणे पाण्यात सोडणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे अत्यंत आवश्यक असते.
दाभोळमधील या घटनेने पुन्हा एकदा माणुसकी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.










