डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्यामुळे लोकशाही विचारांवर आघात- मिलिंद कदम

चिपळूण (वार्ताहर) : मध्यप्रदेश ग्वाल्हेर येथील वकील अनिल मिश्रा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी तसेच भारतीय संविधानाच्या संदर्भात केलेले, ‘आंबेडकर जैसा गंदा आदमी भारत मे नही हुआ’ हे विधान संपूर्ण देशातील मानवतावादी, समतावादी आणि लोकशाही विचारांवर आघात करणारे असल्याचे मत खेरशेत येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कदम यांनी व्यक्त केले आहे. भारतीय संविधानाचा निर्माता, अंधकारमय समाजाला ज्ञान, स्वातंत्र्य आणि समानतेचा प्रकाश देणारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अशाप्रकारे गलिच्छ शब्दप्रयोग उच्चारणे हे केवळ विचार दृष्टतेचे नव्हे तर भारताच्या आदर्श संस्कृतीचा अपमान आहे. संविधानाच्या शपथेवर कार्य करणाऱ्या व्यक्तीने अशी घृणास्पद भाषा वापरणे म्हणजे लोकशाहीचा पाया मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे मिलिंद कदम यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण मानवतेचे तारणहार आहेत त्यांनी माणसा माणसातील भेद मिटवून समतेचा, बंधुत्वाचा आणि न्यायाचा मार्ग दाखविला. त्यांच्या योगदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो, त्या महामानवाबद्दल अपशब्द वापरणे हे असहिष्णुता आणि अथांग ज्ञानाचे प्रदर्शन असल्याची प्रतिक्रिया मिलिंद कदम यांनी यावेळी बोलून दाखविली. सदर वक्तव्याची गांभीर्याने दखल घेऊन अनिल मिश्रा यांच्यावर शासनाने व बार कौन्सिल ऑफ इंडियाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी श्री मिलिंद कदम यांनी केली आहे. वकील हे न्यायव्यवस्थेचे स्तंभ आहेत, त्यांच्याकडून अशा विषारी वक्तव्यांची अपेक्षा असू शकत नाही. जर अशा व्यक्तींना कायदेशीर व्यासपीठावर राहू दिले तर लोकशाहीची मूळ तत्वेच धोक्यात येथील अशी भविष्यकाळाची चिंता मिलिंद कदम यांनी व्यक्त केली आहे. डॉ. आंबेडकरांविषयी असत्य प्रचार करणाऱ्यांचा सामाजिक बहिष्कार व्हावा. आपण तिरस्काराने नवे तर ज्ञान विवेक आणि संविधानिक मूल्यांनी उत्तर दिले पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या विचारानुसार आपण सजग राहिलो तर अशा विषारी प्रवृत्तींचा पराभव आपोआप होईल, असे आवाहन मिलिंद कदम यांनी केले आहे. डॉ. आंबेडकर हे विचारांचे नाव आहे, त्या विचारांना कलंकित करणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही असे शेवटी कदम यांनी आपली भावना व्यक्त केली. ही घटना देशातील विचार स्वातंत्र्य आणि सामाजिक सौहार्द यांना गंभीर धक्का देणारे असल्याचे सांगून मिलिंद कदम यांनी न्यायालयीन तसेच सामाजिक स्तरावर या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.