अमृत दुर्गोत्सवमध्ये पेढे येथील आर. सी. काळे विद्यालयाचा उत्साही सहभाग

चिपळूण प्रतिनिधी : चिपळूण येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयात दीपोत्सवाच्या निमित्ताने विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना “अमृत दुर्गोत्सव २०२५” मध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री. माळी सर यांनी केले.
मुख्याध्यापक माळी सर म्हणाले की, “दिवाळीत किल्ले बांधणे हे फक्त परंपरा नाही, तर त्यातून सकारात्मकतेचे बीज रुजविले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे स्मरण करून त्यांच्या पराक्रमाची प्रेरणा घेणे हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे,” असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणाऱ्या या लोकोउत्सवात विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेने किल्ल्यांची निर्मिती करून मराठी संस्कृती, इतिहास आणि परंपरेचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या वतीने सांगण्यात आले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, ऐतिहासिक जाणीव आणि सृजनशीलता विकसित होते. “आपला सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच खरी शिक्षणाची दिशा आहे,” असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.