स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे- सोनललक्ष्मी घाग

 चिपळूण शहरात काँग्रेसची उत्तर रत्नागिरी विभागाची आढावा बैठक
चिपळूण (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आतापासूनच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष उत्तर विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच चिपळूण नगर परिषदेजवळ धवल व्यापारी संकुल चिपळूण येथे संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र (आबा) दळवी , महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सरचिटणीस शशांक बावचकर, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सरचिटणीस श्रद्धा ठाकूर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आगामी निवडणुका प्रभावीपणे लढविण्यासाठी आवश्यक रणनीती, कार्यपद्धती व जनसंपर्क मोहिमेवर सविस्तर चर्चा केली. काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तर चिपळूण नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून सोमवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या.
नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी ३३ इच्छुकांनी या मुलाखतीत सहभाग घेतला. इच्छुकांच्या पार्श्वभूमी, कार्यकर्तृत्व आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क या सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, नेते अशोक जाधव, माजी नगरसेवक सुरेश राऊत, ॲड. जीवन रेळेकर, काँग्रेसचे माजी चिपळूण तालुकाध्यक्ष भरत लब्धे, सुरेश पाथरे, ओबीसी सेलचे संजय जाधव, मोहन मोरे, सूर्यकांत चिपळूणकर, प्रकाश विंचू, माजी नगरसेविका सौ. गौरी रेळेकर, सौ. विना जावकर, काँग्रेसच्या महिला आघाडी चिपळूण तालुकाध्यक्ष सौ. निर्मला जाधव, माजी नगरसेविका सफा गोठे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह आदी उपस्थित होते.