दिवाळी शिबिरातुन मुलींना मिळाले “सामर्थ्य”

निगुंडळ येथे सामर्थ्य सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम

गुहागर प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात मुलींमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.त्यांना स्व संरक्षित करणे, आत्मविश्वास आणि सद्विचारांची जाणीव होणे गरजेचे आहे आणि हाच धागा पकडून सामर्थ्य सेवा संस्थेने मुलींसाठी दिवाळी सुट्टीत एकत्रिकरण शिबिर राबवून एक अनोखा उपक्रम राबविला आहे.
निगुंडळ येथे पार पडलेल्या या शिबिरात विविध उपक्रम पार पडले. तीन दिवस चाललेल्या या शिबिरात एकूण 25 मुलींनी सहभाग घेतला होता. या काळात मुलींना योगाभ्यास, बौद्धिक विकास, पारंपरिक खेळ, रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा यांसह विविध उपक्रमांतून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले.
एकतेचा संदेश देणारी मुलींची नाटिका आणि नयन केंबळे, रीषभ मुकनाक, शुभम शिरकर, सार्थक शिरकर, निष्णात ताम्हणकर या छोट्या मुलांनी तयार केलेला मल्हारगड प्रतिकृती हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. शिबिराचे मार्गदर्शन संस्थेच्या संस्थापक व सचिव सौ. प्रज्ञा ताम्हणकर यांनी केले. तर यामध्ये सहभागी विद्यार्थिनींना योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी योगा शिक्षक विश्वास शिर्के, सचिन येवले, तसेच विविध खेळांतून आपले बुद्धीकौशल्य विकसित करण्यासाठी अवधूत समगिस्कर यांनी विशेष मार्गदर्शन केले. सहभागी मुलींनी आपल्या वक्तृत्वातून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या मुलींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरविंद धामणस्कर, सदस्या रंजना धामणस्कर, निगुंडळ गावच्या सरपंच दीप्ती गिजे, पोलिस पाटील प्रकाश आंबोकर, संतोष धामणस्कर गुरुजी, ग्रामस्थ व पालक संदीप केंबळे व सौ. केंबळे, वडद गावचे उपसरपंच संदीप धनावडे, मार्गताम्हाणे येथील योगा शिक्षक विश्वास शिर्के सर, शिष्य सचिन येवले, तळवली गावातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रदीप चव्हाण आणि उत्तम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.