राजापुर पोलीसांसमोर खूनाच्या तपासाचे कडवे आव्हान
राजापूर प्रतिनिधी : तालुक्यातील रायपाटण, टक्केवाडी मधील एका वृध्द महिलेचा खून होऊन तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापही या खूनातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आलेले नाही. या महिलेचा खून हा नेमक्या कोणत्या कारणासाठी झाला, खून कुणी केला याबाबतचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत असून पोलिसांनी या खूनाच्या तपास कामी विविध मार्गे तपास यंत्रणा राबवून देखील ठोस धागेदोरे न मिळाल्याने व आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश न आल्याने पोलीसांच्या कार्यपध्दतीवरचच् प्रश्नचिन निर्माण झाले आहे.
१५ दिवसांपूर्वी रायपाटण गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. रायपाटण, टक्केवाडी येथील ७४ वर्षीय महिला श्रीमती वैशाली शेटे या त्यांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत सापडल्या होत्या. त्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस यंत्रणा आपल्या विविध तपास यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले होते. मयत महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने श्वान पथकाला त्या आधारे आरोपीचा माग काढण्यात अडथळे आले होते. दरम्यान त्या महिलेचा मृत्यू हि हत्याच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला व राजापूर पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांकडून कसून तपास सुरु असून अजून पर्यंत पोलिसांना आरोपीचा माग काढीत त्यांच्या पर्यंत पोचण्यात यश आलेले नाही. जवळपास पंधरा दिवस उलटले तरी आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे गूढ वाढत चालले आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार मयत महिलेचे दागिने तिच्या घरीच सापडले होते. तर गळ्यात असलेली सोन्याची माळ मिळाली नव्हती. त्यामुळे नेमकी हि हत्या कोणत्या कारणासाठी झाली ते काही स्पष्ट झालेले नाही. या खून प्रकरणाचा छडा लावायचाच या उद्देशाने पोलीस तपास सुरु आहे. पण अद्याप कुठलाच धागा पोलिसांच्या हाती न सापडल्याने आरोपी अद्यापही मोकाटच आहेत.
या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली होती. तर पोलीस यंत्रणा रायपाटणमध्ये ठाण मांडून आहे. ग्रामस्थांना बोलावून त्यांच्याकडे विचारणा केली जात आहे. पण तपासात समाधानकारक असे काहीच सापडलेले नाही. याबाबत कुणाला काही समजले अथवा काही माहिती तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल अशी ग्वाही देत राजापूर पोलिसांनी आवाहन केले आहे.
पंधरा दिवस उलटले तरी रायपाटण, मधील महिलेच्या हत्येप्रकरणाचा उलगडा झालेला नाही. पोलीस तपासात कोण कोणती माहिती मिळाली त्याबाबत कमालीची गुप्तता राखण्यात आली आहे .त्या महिलेचे शवविच्छेदनआणि फॉरेन्सिकचे रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र या खूनाचा पोलीसांनी तपास लावावा आणि आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी होत असून पोलीसांपुढे या खूनाच्या तपासाचे कडवे आव्हान ठाकले आहे.










