शेर्ले सरपंच सौ. प्रांजल जाधव राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

जिल्हाभरातून अभिनंदन

बांदा : प्रतिनिधी 

 

महाराष्ट्र प्रदेश सरपंच सेवा संघ अहिल्यानगर तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार शेर्ले (ता. सावंतवाडी) येथील सरपंच सौ. प्रांजल जाधव यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सौ. प्रांजल जाधव यांना सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. जाधव यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

 

महाराष्ट्र प्रदेश सरपंच सेवा संघ अहिल्यानगर तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षीचा आदर्श सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून शेर्ले येथील सरपंच प्रांजल जाधव यांची निवड झाली होती.

 

अहिल्यानगर – सावेडी रोड येथील माऊली संकुल सांस्कृतिक सभागृहात हा राज्यस्तरीय सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, श्रीमहंत डॉ. श्रीकांत धुमाळ महाराज, समाजसेवक यादवराव पानसे, संघाचे संस्थापक तथा सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे उपस्थित होते.

 

यावेळी सौ. प्रांजल जाधव म्हणाल्या, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त शेर्ले ग्रामस्थ यांचा आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माझे आई वडील यांना हा पुरस्कार बहाल करते. मला आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे कायम मार्गदर्शन मिळाले. भविष्यातही गावाच्या विकासासाठी प्रामाणिक काम करणार, असे सांगितले.

———–