आपले गाऱ्हाणे ऐकून घेणारे हक्काचे खासदार मिळाल्याच्या उस्फुर्त प्रतिक्रिया
तीन तालुक्यातील जनता दरबारात ३२५ निवेदने प्राप्
आता दिलेल्या मुदतीत कार्यवाही करण्याची जबाबदारी प्रशासनाची
राजापूर । नरेंद्र मोहिते :
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी २८ ते ३० ऑक्टोबर या तीन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात चिपळूण, देवरूख (संगमेश्वर तालुका) व रत्नागिरी अशा तीन ठिकाणी जनता दरबार घेत मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, प्रश्न, समस्या एकूण घेत याबाबतची निवेदने स्विकारली. तीन तालुक्यात तीन दिवस झालेल्या या जनता दरबारात तब्बल ३२५ निवेदने खा. राणे यांना प्राप्त झाली. प्रत्येक निवेदनकर्त्याचे म्हणने ऐकून घेत त्याचे जागीच उत्तर देत समाधान करतानाच उपस्थित प्रशासकिय अधिकाऱ्यांना ते ते प्रश्न तात्काळ निकाली काढा व त्याचा अहवाल मला द्या असे आदेशही खा. राणे यांनी यावेळी दिले. या जनता दरबारात आपला हक्काचा खासदार भेटला, आपले गाऱ्हाणे ऐकले आणि आपल्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही दिले हे पाहिल्यानंतर त्या तक्रार मांडणाऱ्या सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता.
आता जबाबदारी प्रशासनाची असून खा. राणे यांच्या आदेशानुसार प्रशासनाने या तीन्ही जनता दरबारांतील निवेदने व तक्रारींवर निश्चित करून दिलेल्या वेळेत कार्यवाही केली तर नक्कीच या सामान्य जनतेचे प्रश्न निकाली निघतील आणि ही जनता देखील अधिकाऱ्यांना दुआ देईल यात शंका नाही.
या तीन्ही जनता दरबारात खा. राणे यांनी प्रश्नकर्त्यांचे समाधान करतानाच उपस्थित अधिकारी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनाही चांगलीच लस टोचली. तर यावेळी निवेदने मात्र पुढच्या जनता दरबारात निवेदने नाहीत, कार्यवाही काय झाली याचबरोबर थेट जनतेशी संवाद साधणार असल्याचे खा. राणे यांनी सांगितले. त्यामुळे आंम्हाला न्याय देणारा, आमचे प्रश्न समजून घेणारा आपला हक्काचा खासदार आंम्हाला मिळाल्याची भावना या तीन्ही जनता दरबारात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.
रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नारायण राणे यांनी अनेक वेळा रत्नागिरी जिल्हयाचा दौरा केला. अतिवृष्टी काळात झालेले नुकसान असो वा अन्य कोणतीही घटना असो खा. राणे यांनी तात्काळ दखल घेत त्या त्या ठिकाणी भेट देत पहाणी करतानाच जनतेच्या प्रश्नांचा तात्काळ निपटारा कसा होईल याकडे जातीनिशी लक्ष दिले. तर विविध शासकिय बैठकांसह पक्षाचे कार्यक्रम यांना उपस्थित रहाताना त्यांनी त्या प्रत्येकवेळी आलेल्या सर्वसामान्य जनतेची कामे कशी मार्गीं लावता येतील हेच पाहिले.
गेले महिनाभर खा. राणे यांची प्रकृती बरी नव्हती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र कायमच जनतेत जाऊन काम करण्याची सवय असलेले खा. राणे शांत कसे रहातील. त्यांनी तात्काळ तीन दिवसांचा रत्नागिरी जिल्हा दौरा जाहिर केला व यावेळी आपण थेट जनता दरबार घेऊन जनतेशी संवाद साधणार, त्यांचे प्रश्न जाणून घेणार, निवेदने घेणार असे जाहिर केले. त्याप्रमाणे मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी चिपळूण, बुधवार २९ ऑक्टोबर रोजी देवरूख (संगमेश्वर तालुका) व गुरूवारी ३० ऑक्टोबर रोजी रत्नागिरी अशा तीन तालुक्यांमध्ये हे जनता दरबार पार पडले. या तीन्ही जनता दरबारात जनतेचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. चिपळूण येथील जनता दरबारात ११०, देवरूख येथील जनता दरबारात ११० व रत्नागिरीतील जनता दरबारात १०५ अशा तीन्ही जनता दरबारात एकूण ३२५ निवेदने प्राप्त झाली. यामध्ये रस्ते, विज, पाणीपुरवठा, पुल, साकव, शाळा, ग्रामपंचायतींच्या समस्या या मागण्यांबरोबरच रोजगार निर्मिती, महामार्ग दुरावस्था यांसह काहींनी आपल्या वैयक्तीक समस्या देखील खा. राणेंकडे मांडल्या. राजापूर व रत्नागिरी तालुक्यातील मच्छीमार बांधवांनीही या जनता दरबारात हजेरी लावत मच्छीमार बांधवांच्या समस्या मांडल्या. तर अगदी ९२ वर्षीय वयोवध्द नागरिकांनीही या जनता दरबारात हजेरी लावत आपली कैफियत खा. राणे यांच्यापुढे मांडली. या एकूणच परिस्थिवरून खा. राणेंकडे आपण तक्रार मांडली, निवेदन दिले की आपले काम १०० टक्के होणार असा विश्वास जनतेला आहे हे देखील यातुन दिसून आले.
या तीन्ही जनता दरबारात प्रत्येक निवेदनकर्त्याचे म्हणने समोर बोलावून ऐकून घेत खा. राणे यांनी ज्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करणे शक्य आहे त्यावर जागीच निकाली काढले, तर ज्या ज्या विभागांशी संबधित निवेदन कर्त्यांची निवेदने होती, ती त्या त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करत यावर तातडीने कार्यवाही करा, तक्रारदारांना कळवा आणि त्याबाबतचा अहवाल मला द्या अशा सुचना केल्या. खुद्द खा. राणे यांनी आमचे म्हणने ऐकले, कार्यवाहीचे आदेश दिले, आता आमचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल अशा भावना यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.
या जनता दरबारात खा. राणे यांनी अधिकाऱ्यांचेही कान टोचले. आपण सर्वसामान्य जनतेचे काम करण्यासाठी आहोत याचे भान प्रत्येक अधिकाऱ्याने ठेऊन काम केले पाहिजे असे सांगतानाच पेंडींग हा शब्दच असता कामा नये तर तातडीने निपटारा करण्यावर भर द्या अशा सुचना दिल्या. अधिकारी नक्कीच चांगले काम करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कायद्याच्या बाहेर जाऊन काम करा असे मी सांगणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहून काम करा पण करा असे नमुद करतानाच यासाठी प्रसंगी आपल्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या अशा सुचनाही राणे यांनी यावेळी केल्या मात्र जनतेची कामे झाली नाहीत, तक्रारींचे वेळीच निवारण झाले नाही तर मग मात्र मला माझ्या पध्दतीने लक्ष घालावे लागेल असा सुचक ईशाराही खा. राणे यांनी दिला.
यावेळी त्यांनी उपस्थित भाजपासह अन्य राजकिय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकारी कार्यकर्ते यांचीही चांगलीच शाळा घेतली. जनता दरबारात कशा प्रकारची निवेदने व तक्रार आल्या पाहिजेत हे नमुद करताना विकासात राजकारण न करता काम केले पाहिजे, आपल्या हातुन विधायक व विकासात्मक काम झाले पाहिजेत, जनतेचे आशिर्वाद मिळाले पाहिजेत असे काम करा असा सल्ला दिली. तर सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनीही अधिकारांचा वापर हा विधायक कामासाठी केला पाहिजे असे सांगितले.
या तीन्ही जनता दरबारांनंतर खा. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्या त्या तालुक्यात उपस्थित झालेले प्रश्न, तक्रारी यांबाबत झालेली कार्यवाही याची माहिती दिली. या तीन्ही जनता दरबारात जनतेचा भरभरून मिळालेला प्रतिसाद हे जनतेचे आपल्यावर असलेल्या प्रेमाची प्रचिती असल्याचे खा. राणे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करणे हे आपले कर्तव्य असल्याचे नमुद करतानाच प्रशासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून आपण जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी काम करू असेही त्यांनी नमुद केले. जनता दरबारात उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची तड लावली जाईल असे सांगतानाच भविष्यात रत्नागिरी जिल्हा देखील विकासात्मक प्रगतीत कसा समृध्द होईल, इथल्या जनतेच्या जीवनातही कसा आनंद निर्माण करता येईल यासाठी मी काम करत आहे व करत रहाणार आहे असेही खा. राणे यांनी सांगितले. लवकरच राजापूर व लांजा तालुक्यातही जनता दरबाराचे आयोजन केले जाणार असल्याचे खा. राणे यांनी स्पष्ट केले.
खा. राणे यांच्या या तीन्ही जनता दरबारांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटलीच, पण प्रकृती बरी नसताना डॉक्टारांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही अशा प्रकारे जनता दरबार घेऊन थेट आमच्याशी बोलून आमच्या समस्या ऐकणारे आणि सोडविणारे आमचे हक्काचे खासदार नारायण राणे यांच्या रूपाने आंम्हाला मिळाले अशा प्रतिक्रिया या प्रत्येक जनता दरबारातील जनेतेच्या तोंडून उमटत होत्या. या जनता दरबाराच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देताना खा. राणे यांनी जनतेप्रती असलेले आपले ऋणानुबंध पुन्हा एकदा अधोरेखित केले एवढे मात्र निश्चित.
आमदार किरण सामंत यांची देवरूख व रत्नागिरीतील जनता दरबारात उपस्थिती
खा. राणेंकडून आ. सामंताच्या कामांचे कौतुक
रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या देवरूख (संगमेश्वर तालुका) व रत्नागिरी या दोन ठिकाणी झालेल्या जनता दरबारात राजापूर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी देखील खा. राणे यांच्या पुढे जनता मांडत असलेले प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. खा. राणे यांनी यातील काही विकास कामे व प्रश्नांबाबत आ. किरण सामंत यांना तुम्ही यात लक्ष घाला, मार्गी लावा अशा सुचना केल्या. आ. सामंत यांनी देखील तात्काळ खा. राणे यांच्या सुचनांचे पालन करण्याचे ग्वाही देत आपल्या अखत्यारित असलेले प्रश्न व समस्या तसेच विकास कामांना निधी देण्याबाबत आपल्या सुचनेप्रमाणे कार्यवाही करू असा शब्द खा. राणे यांना दिला. खा. राणे यांनी देखील आ. किरण सामंत हे अत्यंत चांगले काम करत असल्याचे यावेळी नमुद केले.












