मंडणगड प्रतिनिधी :
मंडणगड शहराचे मुलभूत प्रश्न व शहरातील पायाभूत सुविधांच्या निर्मीतीसाठी काम करीत असून ही प्रक्रीया अधिक गतिमान करण्यासाठी नागरीकांनी आमदारांच्या सोबतीने शहराचे प्रश्नावर काम करणारा शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिल्यास ही प्रक्रीया अधिक गतिमान होईल असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंडणगड साईनगर येथे आयोजीत जाहीर कार्यक्रमात केले.
3 नोव्हेंबर 2025 रोजी नगरसेवक योगेश जाधव यांच्या साई नगर या प्रभागात नव्याने उभ्या करण्यात आलेल्या शहरातील पहील्या नानी पार्कचे श्री. कदम यांच्या हस्ते शहर व तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले मंडणगड हे लहान शहर असले तरी त्यांचे वेगळे महत्व आहे. बदलत्या काळातील नागरीक सुविधांचा मंडणगड शहरात विकास करणे हे महत्वाचे आहे. शहरासह तालुक्यातील पहीला नाना नानी पार्क येथील नगरसेवकांच्या मागणीनुसार उभा करण्यात आला असून त्याने शहराचे वैभवात मोठी भर टाकली आहे. केवळ घोषणा करुन भूमीपजनाची औपचारीकता न करता केलेल्या कामाची पुर्तताही केली जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे. व आगामी काळात खेड व दापोली शहराचा धर्तीवरच मंडणगड शहराचा पाणी प्रश्न ही सोडवीला जाईल. नळपाणी योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या जागेसह सर्व समस्या सोडवल्या असून राज्याचे नगर विकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड शहराच्या विकासाकरिता शिवसेना पक्ष म्हणून वचनबध्द असून आगामी काळात आमचा पक्षाचा नगराध्यक्ष निवडून दिल्यास ही प्रक्रीया अधिक गतिमान होईल यात शंका नाही.
या कार्यक्रमाचे प्रस्तावीक नगरसेवक योगेश जाधव तर सुत्रसंचालन विरोधीपक्ष गटनेता विनोद जाधव व चेतन सातोपे यांनी केले या कार्यक्रमास माजी सभापती अमिता शिंदे, माजी जि.प. सदस्या अस्मिता केंद्रे, नगरसेवक योगेश जाधव, गटनेता विनोद जाधव, नगरसेवक आदेश मर्चंडे, नगरेसविका वैशाली रेगे, सेजल गोवळे, नम्रता पिंपळे, तहसिलदार अक्षय ढाकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, सार्वजनीक बांधकाम उपअभियंता प्रमोद कदम, पोलीस निरिक्षक नितीन गवारे, संतोष मांढरे, अर्जुन भोसले, अनिल कलमकर निलेश गोवळे, इरफान बुरोंडकर, चेतन सातोपे, संदेश चिले,संजय शेडगे, हरेष मर्चंडे, यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते












