त्या ‘मरणासन्न नागाला’ मिळाले नवीन जीवन ! सर्पमित्र रमण पेडणेकर यांच्या धारिष्ट्याचे होतेय कौतुक 

त्या ‘मरणासन्न नागाला’ मिळाले नवीन जीवन ! सर्पमित्र रमण पेडणेकर यांच्या धारिष्ट्याचे होतेय कौतुक

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

 

एरव्ही आपल्या फण्याने आणि फुतकाराने भल्या भल्यांची भीतीने गाळण उडवून देणारा ‘नागराज ‘ मरणासन्न होऊन निपचित पडला होता. हालचाल नसल्याने मुंग्यानी सुद्धा त्याच्या शरीराचा ताबा घेण्यास सुरवात केली होती. परंतु म्हणतात ना ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ याचा प्रत्यय मात्र त्याने सर्पमित्राने पाजलेले पाणी पिताच दिला. व पुन्हा सावध होत आपली फणा काढून ‘ टायगर जिंदा है!’ चा प्रत्यय दिला.

* *कांदळगाव येथील घटना* एक अविश्वनिय अशी घटना घडली ती मालवण तालुक्यातील कांदळगाव साळकरवाडी येथे. येथील सुशांत सुर्वे यांच्या घरा नजिक मंगळवारी सकाळी सर्प आल्याचे मसूरे येथील सर्पमित्र रमण पेडणेकर यांना कळविण्यात आले. रमण यांनी नेहमीच्या सवयी प्रमाणे मसुरे येथून साळकरवाडी येथे पोहोचेपर्यंत वेळ होणार असल्याने सदर सर्पावर लक्ष ठेवण्यास घरातील व्यक्तींना सांगितले आणि ते मसूरे येथून निघाले. दरम्यानच्या काळात लाकडी बांबूने या सर्पाला दाबून ठेवल्यामुळे तो मरणासन्न झाला होता. रमण यांनी तेथे पोहोचुन सर्पाला पाहिले असता सदर सर्प निपचित पडला होता. या सर्पाच्या चेहऱ्याभोवती मुंग्या आल्या होत्या. जवळपास मेल्यातच जमा असलेल्या या सापाच्या तोंडाची थोडीशी हालचाल होताना रमण यांना दृष्टीस पडली. म्हणून त्यांनी ह्या सापाला हाताने पकडून निरीक्षण केले आणि लगेच घरातील व्यक्तींना एका भांड्यातून पाणी आणण्यास सांगितले.

* *पाणी पिताच साप झाला सावध*

आणलेले पाणी सापाचे तोंड उघडून त्याच्या तोंडात ओतले. पाण्याचे काही थेंब चेहऱ्यावर पडताच तसेच पाणी पोटात जाताच हा सर्प सावध झाला आणि रमण यांनी थोडासा आवाज करताच फणा काढून राहिला. पुन्हा एकदा त्यांनी त्याच्या शरीरावर पाणी ओतले असता त्याची हालचाल वाढल्याचे सर्पमित्र रमण पेडणेकर यांच्या दृष्टीस पडले. जवळपास मेलेल्या अवस्थेत पोहोचलेल्या या सर्पाला रमण पेडणेकर यांनी पाणी पाजून नवीन जीवन दिले होते. एरवी नागरी वस्तीत येणाऱ्या सापांसह सरपटणाऱ्या जनावरांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणाऱ्या रमण पेडणेकर यांच्यासाठी आजचा कांदळगाव साळकरवाडी येथील हा अनुभव वेगळा होता.

*सापाचा पुनर्जन्म मिळाला याचा आनंद – रमण पेडणेकर*

एका सरपटणाऱ्या जनावराचा जीव वाचवून नव्हे त्याला पुनर्जन्म दिल्यामुळे खूप आनंद झाल्याचे सर्पमित्र रमण पेडणेकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सरपटणारी जनावरे दिसताच त्यांना मारण्याची मानसिकता बदलत चालली असून सर्पाला जीवदान देण्यासाठी दर दिवशी दोन-तीन कॉल आपल्याला असतात असे रमण यांनी सांगितले. रमण सुद्धा या सर्पाला पकडून सुरक्षित रित्या नैसर्गिक अधिवासात सोडतात. साळकरवाडी येथील सुर्वे यांच्या घरानजिक पकडलेल्या या सर्पाला देखील पूर्णपणे सावध झाल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. म्हणतात ना ‘देवतारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय या नागराजास मिळालेल्या पुनर्जन्मातून येत आहे. रमण यांनी सर्पाला कशा पद्धतीने जीवदान दिले त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. रमण पेडणेकर यांनी दाखविलेल्या धरिष्ठ्या मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.