प्रभावती कोळेकर कोल्हापूर च्या नूतन शिक्षण उपसंचालिका

 माखजन
कोल्हापूर शिक्षण उपसंचालिका पदी प्रभावती कोळेकर यांची नियुक्ती झाली आहे.
या नियुक्ती प्रसंगी अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
प्रभावती कोळेकर या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.त्या पदावरून पदोन्नतीने त्यांची कोल्हापूर शिक्षण उपसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी या आधी सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे.दरम्यान कोल्हापूर विभागात कोल्हापूर सह रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सातारा,सांगली आदी जिल्हे येतात.
कोल्हापूर शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या महेश चोथे यांची बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते.महेश चोथे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कामे मार्गी लावली.त्यांच्या कार्यकाळात अंशतः अनुदानित शाळांना दोन वेळा टप्पा वाढ मिळाली.या टप्पा वाढीच्या कामकाजात कोल्हापूर विभागाचे काम जलद,अचूक कसे होईल हे महेश चोथे यांनी नेहमी पाहिले. व टप्पा वाढीचा लाभ, लाभार्थ्यांना राज्यात सर्वात प्रथम कोल्हापूर विभागात मिळवून देण्यात त्यांचा अग्रक्रम राहिला.
दरम्यान कोल्हापूर च्या शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर संघटनेच्या प्रा रत्नाकर माळी,प्रा भारत शिरगावकर,प्रा दीपक पाटील व अन्य पदाधिकारी यांनी भेट घेत बुके देऊन स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
भविष्य काळात शिक्षकांना ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न् केला जाईल असे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी आश्वासित केले.