तिसऱ्या दिवशीही पोलीसांच्या हाती काहीच धागेदोरे नाहीत
खून, करून लुट व चोऱ्यांच्या तपास कामात पोलीस प्रशासनाला अपयश
राजापूर : तालुक्यातील पुर्व भागात रायपाटण येथे भर वस्तीत झालेल्या वृध्देच्या खुनाचा उलगडा तब्बल सव्वा महिना उलटला तरी अद्याप झालेला नाही. ही घटना ताजी असतानाच आता याच भागात खडीकोळवण येथे शनिवारी मध्यरात्री पाच ते सहा जणांच्या टोळक्याने घरात घुसून सदानंद मोरे कुटुंबीयाना कोयत्याचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. २४ तासापेक्षा अधिक काळ उलटूनही या प्रकरणाचेही धागेदोरे पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत. तालुक्यात गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारे खून, चोरी, दुचाकी चोऱ्या, अपहरण करून लुट या घटना घडत असताना पोलीस यंत्रणेला याचा छडा लावण्यात पुर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या एकूणच घटनांनी राजापूरकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून या घटनांचा पोलीस प्रशासनन तपास कधी लावणार? असा सवाल जनतेतुन उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात गेल्या दोन महिन्यात घरफोडी, दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. तर पुर्व भागात रायपाटण येथे भर वस्तीत १४ ऑक्टोबर रोजी एका वृध्देचा खून झाला होता. या खूनाचा अद्याप उलगडा झालेला नाही. तर मुंबई गोवा महामार्गावर कोदवली येथे दसऱ्याच्याच दिवशी एका महिलेला गाडीत लिप्ट देऊन लुटण्याचा प्रकार घडला होता, त्याचाही अद्याप तपास लागलेला नाही. तर कोंडये व त्यानंतर कळसवली, नाणार, कुंभवडे या भागात घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यातील आरोपीही पोलीसांना अद्याप सापडलेले नाहीत. तर राजापूर शहरासह कोंडये व अन्य भागातुन दुचाकी चोरीला गेल्या होत्या त्या चोरांचाही पोलीसांना थांगपत्ता लागलेला नाही. केवळ तपास सुरू आहे असे परवलीचे उत्तर पोलीसांकडून दिले जात आहे.
खून, चोरी, अपहरण करून लुटमार करणारे हे आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. त्यातच शनिवारी मध्यरात्री खडीकोळवण येथील सदानंद शांताराम मोरे यांच्या घरात शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे ५ ते ६ दरोडेखोरांच्या टोळक्याने अंधाराचा फायदा घेत थेट घरात घुसून लुटमारीचा प्रयत्न केला. कोयता, धारदार हत्याराने मोरे कुटुंबाला धमकावत “पैसे द्या नाही तर जीव गमवावा लागेल!” अशी धमकी दिली.
सदानंद मोरे, त्यांची पत्नी व तीन मुली असे कुटुंब झोपेत असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराच्या मागच्या खिडकीतून दरोडेखोरांनी प्रवेश केला आणि घरात मौल्यवान वस्तूंचा शोध घेत फिरू लागले. अचानक घरात अनोळखी ५ ते ६ जण घुसलेले पाहून मोरे कुटुंब जागे झाले. कुटुंबाने गोंधळ आरडा ओरडा करतानाच दरोडेखोरांनी घरातीलच कोयता हातात घेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. “पोलिसात गेलात तर संपवून टाकू!” अशी धमकी दिली. पैसे आणि दागिन्यांची मागणी दरोडेखोरांकडून करण्यात आली. घामाघूम झालेल्या मोरे कुटुंबाने तोंड बंद ठेवत जीव वाचवण्याच्या उद्देशाने घरात मुलींनी डब्यात बचत केलेली रक्कम काढून त्यांना दिली. यामध्ये १६०० रुपयाच्या आसपास रक्कम त्यांनी दरोडेखोरांच्या हातात ठेवले. दरोडेखोरांनी डोक्यावर कानटोपऱ्या घातल्या होत्या, त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. याच दरम्यान मोरे कुटुंबातील ओरडण्याचा आवाजाने आजूबाजूचे गावकरी त्यांच्या घराच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच हे टोळकं घाईघाईने अनुस्कुरा मार्गाने गाडीने पसार झाले.
या घटनेची तक्रार सदानंद मोरे यांनी रात्री 2 वाजता रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात नोंदवली. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी अज्ञात चोरटयां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घरातील पैसे साठवण्याच्या डब्यातील हजार ते बाराशे रूपये गेल्याची नोंद पोलीसांनी केली आहे.
उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांसह रायपाटण दुरक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मात्र अद्यापही या प्रकरणी काहीच धागेदोरे पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत. या भागातील पहिल्या गुन्ह्याचा उलगडा होण्यअगोदरच दुसरी दरोड्याची घटना घडल्याने या परिसरातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे.
राजापूर तालुक्यात वारंवार घडणाऱ्या या घटना व त्याचा न झालेला उलगडा यामुळे पोलीस प्रशासनाच्या एकूणच कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ओणी पाचल कडून अणूस्कुरा मार्गे पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारा हा मार्ग कायमच अशा चोर व दरोडेखोरांसाठी सोयीचा मार्ग ठरलेला आहे. मात्र या ठिकाणी अणूस्कूरा येथे पोलीस चौकी असूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे या वारंवार घडलेल्या घटनांवरून पुढे आले आहे. या ठिकाणी असलेला सीसीटीव्हीही तकलादू ठरत आहे. यामध्ये गाडया जाताना येताना दिसतात पण त्यांचे नंबर सीसीटीव्हीत दिसत नाहीत हे शनिवारच्या घटनेने स्पष्ट झाले आहे.
टोळक्याकडून पांढऱ्या स्कार्पिओचा वापर
खडीकोळवण येथे घरात घुसलेले हे टोळके एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ मधून आल्याची माहिती पुढे आली असून ती गाडी अणूस्कुरा घाटातुन पुढे गेल्याचेही दिसून येत आहे. ही गाडी ओणी, पाचल व अणूस्कुरा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसुन येत आहे. ओणी येथील पुलाखालुन व पुढे पाचल येथून मध्यरात्री पुढे गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. मात्र यात नंबर दिसत नसल्याने पोलीसांच्या हाती काहीच लागलेले नाही. पोलीसांकडून या तपास कामी काही टिम तयार करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र २४ तासापेक्षा अधिक काळ उलटूनही या प्रकारचा छडा लागलेला नाही.
जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी राजापुरातील या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन या घटनांचा उलगडा करून राजापूर वासीयांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा अशी मागणी जनतेन होत आहे.












