दोडामार्ग – प्रतिनिधी
दोडामार्ग आणि गोवा सीमेवर एका कारने चार वाहनांना धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
गोवा व महाराष्ट्राच्या दोडामार्ग सीमेवर एक कारचालक रस्त्याच्या बाजूला उभा होता.त्याचवेळी एक दुचाकीस्वार गोव्यातून दोडामार्गकडे येत होता.
दरम्यान, दोडामार्ग मधून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी एक कार सीमेवर आली.या कारने अचानक आपली दिशा बदलत विरुद्ध दिशेला धाव घेतली.यामुळे, प्रथम समोरील दुचाकीस्वाराला धडक दिली, त्यानंतर लगेच दुसऱ्या दुचाकीला ठोकरले.यानंतरही, कार थांबली नाही आणि पुन्हा विरुद्ध दिशेला जात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली.
या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, धडकेचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकून परिसरातील स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली.कारची धडक बसताच दुचाकीस्वार हवेत उसळून पडला, यात त्याचा उजवा पाय गंभीर जायबंदी झाला आहे. त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी गोवा येथील अजिलो रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अपघातग्रस्त कारमधील चालकाचे डोके स्टेअरिंगवर आपटले आणि तो किरकोळ जखमी झाला.
स्वतः जखमी झालेला असतानाही, या चालकाने जीवाची तमा न बाळगता इतर प्रवाशांच्या मदतीने कारमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
अपघातामध्ये दोन्ही कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे.













