कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी

मनसे उपजिल्हाधक्ष विनोद जानवळकर यांची तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

गुहागर प्रतिनिधी
कोकणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भात व नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी तहसीलदार तसेच कृषी अधिकारी, गुहागर यांना निवेदन देऊन सर्व प्रभावित शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई तात्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे मोठ्या मेहनतीने उभी केलेली भातशेती जमीनदोस्त झाली असून कापणीला आलेली पिके नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेल्याने ते आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या संकटात आले आहेत. पंचनामे सुरू असले तरी प्रत्यक्षात किती नुकसानभरपाई मिळणार याबाबत शेतकरी अनिश्चिततेत आहेत.
मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, “कोकणातील शेतकरी स्वाभिमानी आहे. तो कधीही सरकारकडे हात जोडून मदत मागत नाही. पण आजच्या आपत्तीच्या काळात सरकारने पुढाकार घेऊन सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय्य आणि सरसकट नुकसानभरपाई द्यावी. तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली गेल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही.”
भातशेतीचा पेंढा हा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला जातो. मात्र पावसामुळे पेंढा खराब झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागात भात शेतीनंतर घेतली जाणारी इतर पिकेही धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी सर्व बाजूंनी मोठ्या संकटात अडकला आहे.