रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीतील दोन सोन्याच्या व्यापाऱ्यांची कोल्हापूर येथील सोन्याच्या व्यापाऱ्याकडून तब्बल 3 कोटी 2 लाख 66 हजार 930 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याच्या मॅनेजरने कोल्हापूर येथील विनायक बंडूजी पोतदार व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, रत्नागिरीतील तक्रारदार राजेंद्र वसंत चव्हाण (रा.खेडेकर संकुल झाडगाव,रत्नागिरी) हे रत्नागिरीतील अर्हम् गोल्ड आणि ए जी गोल्ड फर्म या दोन ठिकाणी कमॅनेजर म्हणून का पाहतात. फर्मचा मुंबई व रत्नागिरी येथे देखील त्यांचा सोन्याचा होलसेल व्यापार आहे. तक्रारदार चव्हाण यांनी कोल्हापूर येथील व्यापारी विनायक बंडूजी पोतदार यांच्या माध्यमातून सोन्याचे व्यवहार केले. रत्नागिरीतील श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक चंद्रकांत सागवेकर यांनी पोतदार यांची विनायक पोतदार सोबत ओळख करून दिल्याचे तक्रारदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. 18 फेब्रुवारी 2025 आणि 1 मार्च 2025 रोजी झालेल्या सोन्याच्या व्यवहारासाठी तक्रारदार चव्हाण यांनी 22 कॅरेट सोन्याचे सुमारे 1 किलो 987 ग्रॅम इतक्या प्रमाणात सोन्याचे दागिने पोतदारला विकले होते. या व्यवहाराची एकूण किंमत 1 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक होती.याचप्रमाणे इतर बिलांद्वारे देखील एकूण 3 कोटी 2 लाख 66 हजार 930 इतका आर्थिक व्यवहार झाला होता. मात्रा, त्यातील रक्कम पोतदारकडून अदा करण्यात आली नाही. तक्रारदाराच्या नावाने दिलेले धनादेश नंतर पेमेंट स्टॉप बाय ड्रॉवर अशा कारणावरून बँकेकडून परत आले. विनायक पोतदार यांनी दिलेले धनादेश अनुक्रमे 1 कोटी 50 लाख 28 हजार 307 आणि 1 कोटी 52 लाख 38 हजार 623 इतक्या रकमांचे होते. मात्र, हे दोन्ही धनादेश बँकेकडून थांबविण्यात आले. यानंतर संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणात तक्रारदार चव्हाण दिलेल्या तक्रारीवरुन कोल्हापूर येथील सोन्याचा व्यापारी विनायक बंडूजी पोटदार व त्याचे सहकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.










