चिपळण (प्रतिनिधी) : ‘कोकण आणि कंबोडिया’ प्रदेशात भौगोलिक साधर्म्य असून तिथल्या पाणी टंचाई निवारणार्थ केलेल्या उपायांचा आपणही विचार करायला हवा, असे मत प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ, टपाल तिकिटांचे प्रसिद्ध अभ्यासक आणि जीवाश्म संग्रहाचे ‘लिम्का बुक’ रेकॉर्ड होल्डर डॉ. अजित वर्तक यांनी व्यक्त केले. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात नुकतेच डॉ. अजित वर्तक यांचे ‘कंबोडियातील जलव्यवस्थापनाची रहस्यमय तंत्रे’ या विषयावर दृकश्राव्य व्याख्यान संपन्न झाले. त्यावेळी डॉ. वर्तक यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर डॉ. वर्तक, वाचनालयाचे कोषाध्यक्ष सुबोध दीक्षित, सहकार्यवाह विनायक ओक उपस्थित होते. डॉ. अजित वर्तक यांचा सत्कार वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांच्या हस्ते ग्रंथभेट आणि उपरणे देऊन करण्यात आला. प्रारंभी वाचनालयाचे संचालक धीरज वाटेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून व्याख्यान विषयाची माहिती प्रास्ताविकातून दिली. डॉ. वर्तक यांनी स्लाईड-शोद्वारे माहिती देताना सांगितले की, ‘कंबोडिया मध्ये जांभा दगड आहे. कोकणात ज्याप्रमाणे नैऋत्य मोसमी पाऊस पडतो तसा पाऊस तिकडे पडतो. कोकण आणि कंबोडिया या हजारो मैल अंतरा वरील प्रदेशामध्ये असणारे भौगोलिक साधर्म्य महत्त्वाचे आहे. आपण कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जाण्या अगोदर त्या ठिकाणचा अभ्यास करून जाणे महत्त्वाचे आहे हे वर्तक यांनी आवर्जून सांगितले. कंबोडिया मध्ये ‘अंग्कोर’ हे मंदिर आहे. कंबोडियाचा इतिहास हा चिनी बखरी मध्ये मिळतो. इसवी सन ८०२ मध्ये राजा जयबर्मन यांनी कंबोडियाचे साम्राज्य उभे केले. तेथील प्रजा राजाची आज्ञा ही देवाची आज्ञा समजत असे. कंबोडियातील टपाल तिकिटे, नाणी, नोटा इत्यादीवर अंग्कोरचे चित्र आहेच, मात्र भारत, जपान, व्हिएतनाम यासारख्या देशांनी आपल्या नाणी, नोटा, तिकीटावर ते चित्रित केल्याचे त्यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून मांडले.
कंबोडियामधील ‘मेकांग’ ही महत्त्वाची नदी असून ती नऊ प्रवाहाद्वारे समुद्राला मिळते. कंबोडियातील लोक पाण्याला खूप महत्त्व देतात. नदीचा उगम होणारा डोंगर देवासमान मानतात. कंबोडिया आणि कोकणामध्ये साम्य असल्याने आपणही पाण्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले पाहिज, असे डॉ. वर्तक यांनी सांगितले. प्रा. राम दांडेकर यांनी स्लाईड शो साठी सहाय्य केले. या व्याख्यानासाठी डॉ. दीपक विखारे, अख्तर दलवाई, विशाखा चितळे, सेजल कोकाटे, नंदू साडविलकर, अभय अंतरकर, मच्छिंद्रनाथ वाटेकर, प्रकाश काणे, समीर कोवळे, सतीश कदम, प्रकाश देशपांडे, मंगेश बापट, सौ. नांदगावकर आदी मान्यवर तसेच वाचनालयाचे कार्यकारी मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते. आभार व्यक्त करताना विनायक ओक यांनी डॉ. अजित वर्तक यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्याचे आवर्जून सांगितले.












