चोरट्यांकडून वृद्ध महिलेचा खून

कट्टा खालची गुरामवाडी येथील घटनेने मालवण तालुका हादरला

पोलीस व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु

हल्लेखोराचा तपास लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही

नातेवाईक व स्थानिक नागरिकांची संतप्त भूमिका

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथील रोहिणी रमेश गुराम वय 65 या वृद्धेचा घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यानी हल्ला करून खून केल्याची घटना खळबळजनक घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर चोरटे पसार झाले. दिवसा घडलेल्या या घटनेने मालवणसह संपुर्ण जिल्हा हादरला आहे.

दरम्यान, पोलीस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून सायंकाळी उशिरापर्यंत तपास सुरु होता. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला होता. या संपुर्ण घटनेने नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले. हल्लेखोरांचा तपास लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका उपस्थित उपस्थितानी घेतली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी गुराम या खालची गुरामवाडी येथील एका अंगणवाडीत मदतनीस म्हणून कामाला होत्या. तिचा मुलगा येथील स्थानिक होलसेल व्यापाऱ्यांकडे कामास आहे. यावर त्याचा उदरनिर्वाह सुरू होता. रोहिणी गुराम या नेहमी प्रमाणे अंगणवाडी येथे सकाळी कामासाठी गेल्या. काही वेळात त्या आपल्या घरी आल्या. दरवाजाचे कुलूप उघडून आत गेल्या. त्यावेळी घराच्या मागच्या बाजूने छपराची कौले काढून आता प्रवेश केलेल्या अज्ञात चोरटा निदर्शनास आला. त्याला प्रतिकार केला असता त्यांनी रोहिणी हिच्या डोक्यावर एका दगडी विटाने जोरदार प्रहार केला. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून चोरटा तेथून पळाला.

रोहिणी गुराम हिला काही कामासाठी गावातील मंदिरात जायचे होते. याबाबत तिने आपले दीर अनिल गुराम यांना सांगितले होते. ते मंदिरात जाण्यासाठी तिला घरी बोलवायला आले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी आजूबाजूचे शेजारी व मुलगा यांना बोलावून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी ती मयत झाल्याचे सांगितले. पोलिसांना घटनेची माहिती दिली. मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस निरीक्षक माने, खाडे यांसह मालवण पोलीस पथक दाखल झाले. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम याही दाखल झाल्या. त्यासह श्वान पथक, ठसे तज्ञ तसेच फॉरेन्सिक पथक दाखल झाले. संपुर्ण घराचा परिसर सिल करून सायंकाळी उशिरा पर्यत तपास सुरु होता.

गेल्या दोन महिन्यापासून या परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत. पण याबाबत कोणतीच ठोस कारवाई होत नाही. या भागात कामानिमित्त आलेल्या अनोळखी व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्याचीही नोंद पोलिस ठाण्यात नाही. आता ही घटना दिवसा घडली सर्वत्र असुरक्षेचे वातावरण आहे. तारी हल्लेखोर चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका काही नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतली आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

रोहिणी गुराम हिचा खून झाल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. हा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचे समजतात या परिसरात अनेक घरांमधील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घरातील पुरुष कामानिमित्त बाहेर गेल्याने या भागात स्त्रिया घरात असतात. मग एकट्या स्त्रियांनी घरात राहायचे कसे आमच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे.

चोरी करून चोराटा लावतो आग?

काही दिवसांपूर्वी पुर्ण प्राथमिक केंद्र शाळा कट्टा नंबर एक येथील अंगणवाडी येथे सायंकाळी चोरी झाली. एक मोठा टीव्ही चोरीस गेला. यावेळी चोरट्यानी साहित्याला आग लावली होती. यात अनेक कागदपत्र जळाली. त्यानंतर गेले चार दिवस खालची गुरामवाडी येथील काही बंद घरे चोरट्यानी फोडली. अशी चर्चा होती. सोमवारी खालची गुरामवाडी येथील घरात चोरटे घराच्या विटा काढून घुसले यावेळी रोहिणी गुराम घरात आल्या त्यावेळी चोरट्यानी खुनी हल्ला केला. यावेळी घरातील साहित्य अस्तव्यस्त होते. घरात एका ठिकाणी आग लावण्यात आली होती. असे पोलीस तपासात पुढे आले आहे.

सखोल तपास सुरु : पोलीस निरीक्षक जगताप

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने सखोल तपास सुरू आहे. खुनी हल्लेखोराचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास व कार्यवाही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ यांची मोठी गर्दी घटनास्थळी होती.