राजापूर । प्रतिनिधी : ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेला दागिने चोरी केल्याबद्दल दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. राजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. हाके यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी चंद्रकांत सखाराम शेलार (६७, भटवाडी, सोलगाव, राजापूर) यांनी फिर्याद दिली असून वैष्णवी विलास नलावडे (४२) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
राजापूर तालुक्यातील सोलगाव, भटवाडी येथील चंद्रकांत शेलार हे पत्नी चंद्रकला (६४) यांच्यासोबत राहतात. पत्नीला मधुमेहाचा आजार असल्यामुळे घरकाम करताना त्रास होतो त्यामुळे शेलार यांनी ‘मोलकरीण हवी आहे,’ अशी जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रांतून दिली. त्या जाहिरातीला प्रतिसाद देत आरोपी वैष्णवी नलावडे ही शेलार यांच्याकडे घरकामासाठी आली. पंधरा दिवस काम करून तिने शेलार दाम्पत्याचा विश्वास संपादन केला.
दरम्यान दि.८ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान शेलार दाम्पत्य जेवण करून हॉलमध्ये झोपले होते. वैष्णवी ही ‘मी टॉयलेटला जावून येते’, असे सांगून मागच्या दरवाज्याने निघून गेली. ती २:३० वाजेपर्यंत परत आली नाही म्हणून श्रीमती चंद्रकला शेलार यांनी शोध घेतला तर त्यांना वैष्णवी कुठेही दिसली नाही. त्यांनी घरात येवून वैष्णवी हिचे साहित्य पाहिले तर तिचे साहित्य देखील घरात नव्हते. त्यानंतर कपाट उघडून पाहिले असता कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले दागिने व रुपये पाच हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले,
त्यावरून चंद्रकांत शेलार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या मुद्देमालात ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, ३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंग जोड, ४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील कुड्यांचा जोड व ५ हजार रुपये रोख अशा एकूण २ लाख १३ हजार ७६० रुपयांच्या वस्तूंचा समावेश होता. चोरी केल्यानंतर वैष्णवी ही गुजरातमधील वलसाड येथे तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडे गेली. दरम्यान पोलीसांनी तिच्या मोबाईल नंबरवरील कॉल व मोबाईल लोकेशन यावरून तपास सुरू केला. त्या आधारे गुजरातवरून परत येताना तिला चिपळूण बस स्थानकात अटक करण्यात आली.
पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीमध्ये वैष्णवी हिच्याकडे शेलार यांच्या घरातून चोरलेले २ लाख ८ हजार ७६० रुपये किमतीचे ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, रुपये पाच हजार रोख रक्कम व इतर खोटे दागिने सापडले होते. वैष्णवी हिच्याकडे सापडलेले मंगळसूत्र व रोख पाच हजार रूपये शेलार दाम्पत्याला ओळख पटवल्यानंतर परत करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी ३ जून २०२५ रोजी सुरू झाली तेव्हापासून वैष्णवी नलावडे ही तुरुंगामध्ये होती. ती तुरुंगात असतानाच ११ नोव्हेंबर २०२५ रोजी या प्रकरणात अंतिम निकाल देण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोबीन शेख यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून सचिन बळीप यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी वैष्णवी हिला शिक्षा सुनावली. सहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुभाष सुपेकर यांनी सरकार पक्षातर्फे साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या व अंतिम युक्तिवाद केला.












