दारूसह साडे सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त
बांदा पोलिसांची कारवाई
बांदा (प्रतिनिधी) :बांदा पोलिसांचा तपासणी चेकनाका चुकविण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या बेकायदा दारू वाहतूक विरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत २ लाख ५९ हजार रुपयांची दारू व वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण १७ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कणकवली तालुक्यातील चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास बांदा – शेर्ले पुलावर करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांद्यातून बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती बांदा पोलिसांकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार बांदा आळवाडा येथे पोलिसांनी सापळा रचला होता. बांदा बाजारपेठेतून शेर्ले मार्गे जाणारी इनोव्हा क्रिस्टा कार (एमएच ०८ एजी १२२१) गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला. गोवा बनावटीच्या सीलबंद प्लास्टिकच्या एकूण ४८ बॉटल्सचे ६० बॉक्स (प्रत्येक बॉटलची किंमत रु. ९० प्रमाणे) असा एकूण २ लाख ५९ हजार २०० रुपयांचा दारूसाठा होता. तसेच सुमारे १५ लाख रुपयांची कार पोलिसांनी जप्त केली.
पोलिसांनी याप्रकरणी राजकुमार श्रीकांत जाधव (वय २०, रा. बांधकरवाडी, ता. कणकवली),अंकुर श्रीकांत जाधव (वय २३, रा. बांधकरवाडी, ता. कणकवली), सोहम स्वप्निल पाताडे (वय २१, रा. तेलीआळी, कणकवली) व शुभम संतोष ठाकूर (वय २२, रा. आशिये ठाकूरवाडी, ता. कणकवली) या चार संशयितांना ताब्यात घेतले.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील, राजाराम कापसे यांनी केली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गवस करत आहेत.










