विजयदुर्ग येथे १५ नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन जलतरण स्पर्धा ; देशभरातून ५१ जलतरणपटूंचा सहभाग

वाघोटण खाडी मॅरेथॉन स्पर्धेचे सलग ५ व्या वर्षी केले आयोजन 

देवगड (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग येथे स्थापन केलेल्या अजिंक्य आरमाराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पर्यटन आणि जलक्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘जिम स्विमिंग अकॅडमी, कोल्हापूर’ व श्री दुर्गामाता कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वी वाघोटण खाडी मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉन जलतरण स्पर्धा दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

 

ही स्पर्धा भारतामधील एकमेव खाडीतील लांब अंतराची जलतरण स्पर्धा असून यावर्षी या स्पर्धेचे पाचवे वर्ष साजरे केले जात आहे. ३० किमी (मालपे ते विजयदुर्ग) आणि १५ किमी या दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे.

 

राज्य संघटनेच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेस ठाण्याचे प्रशिक्षक श्री कैलाश आखाडे व रायगडचे क्रीडा मार्गदर्शक श्री नीलकंठ आखाडे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

 

स्पर्धेसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री सतीश कदम, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष श्री राजेश मोरे, अॅड. प्रवीण भंडारी (कोल्हापूर) व श्री सुधीर चोरगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

विजेत्यांना एकूण ₹२ लाख ५२ हजारांचे रोख बक्षिस, ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व जलतरणपटूंना फिनिशिंग मेडल व प्रमाणपत्र देण्यात येईल.

 

या वर्षीच्या स्पर्धेत राज्य व देशभरातील ५१ जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला आहे. सहभागींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक जलतरणपटूला एक बोट, स्पीड बोट आणि डॉक्टरांचे पथक उपलब्ध असेल.

 

या स्पर्धेतून अनेक जलतरणपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. आयुष तावडे, मानव मोरे आणि आयुषी आखाडे यांनी इंग्लंड–फ्रान्स दरम्यान इंग्लिश चॅनेल पार करून भारताचा तिरंगा फडकवला, तर मानव मोरे याने स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे कांस्य पदक पटकावले. तसेच अवघ्या सहा वर्षांच्या रियांश दीपक खामकर याने १५ किमी अंतर फक्त ३ तास १५ मिनिटांत पूर्ण करून ‘इंडिया रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवले.

 

या यशस्वी जलतरणपटू व त्यांचे प्रशिक्षक श्री कैलाश आखाडे यांचा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष सत्कार केला होता.

 

गेल्या आठ वर्षांपासून ५०० मीटर ते ५ किमी अंतराच्या विविध वयोगटांतील (५ ते ८० वर्षे) जलतरण स्पर्धा घेण्यात येत असून आगामी एप्रिल २०२६ मध्ये पुढील स्पर्धा होणार आहे.

 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी. सभापती रवी पाळेकर , सौ. संजना आळवे, प्रसाद देवधर, रविकांत राणे, शरद डोंगरे, विजयदुर्ग बोट क्लब, सादिक डोंगरकर, तौसिफ शिकलगार, विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजु परुळेकर, राकेश तेली व सौ. संजना आळवे आदींचे मोलाचे योगदान लाभले आहे.

 

या स्पर्धेचे नियोजन जिम स्विमिंग अकॅडमी, कोल्हापूर चे श्री अजय पाठक यांनी केले आहे