लांजा नगरपंचायत निवडणूक, उमेदवारांची धाकधूक वाढली
लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज सलग चौथ्या दिवशी गुरुवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून अद्यापही उमेदवारांची घोषणा झालेली नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे .त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे .
लांजा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे .तर सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सुरुवात झाली असली तरीही सोमवार दिनांक १० ते आज गुरुवार दिनांक १३ या चार दिवसांच्या कालावधीमध्ये अद्याप एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. एकापेक्षा अधिक इच्छुकांची संख्या असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आणि विशेषतः शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारांची नावे अद्यापही घोषित करण्यात आलेली नाहीत. तर महाविकास आघाडी कडून काही उमेदवार निश्चित करण्यात आलेले असले तरी अधिकृतपणे कोणत्याही पक्षाने उमेदवार निवडी जाहीर केली नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत .
पक्ष नेतृत्वाकडून उमेदवार जाहीर करण्याबाबत दिरंगाई होत असल्याने इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्यामध्ये धाकधूक वाढली आहे. कमी कालावधीमध्ये मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे? असा प्रश्न इच्छुक उमेदवारांसमोर निर्माण झालेला आहे. सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून पुढील एक-दोन दिवसात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.













