सावंतवाडी तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण ७६ टक्के मतदान

सरपंचपदाच्या १२५ तर सदस्यपदाच्या ६४९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

सोनुर्लीत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न रोखला

सातार्डा येथे दुकाने बंद केल्याने स्थानिकांत नाराजी

कलंबीस्त सांगेली व अन्य काही मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने खोळंबा

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीत तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीसाठी एकूण ७६ टक्के इतके मतदान झाले. तालुक्यातील एकूण

६४ हजार मतदारांपैकी सुमारे ५५ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर

एकूण ४५ सरपंच पदासाठीचे १२५ उमेदवार व सदस्य पदासाठी निवडणूक लढवत असलेल्या ३०६ पैकी ६४९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. बहुतेक ग्रामपंचायतीसाठी चुरशीचे मतदान पाहायला मिळाले. प्रत्येक गावातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसले.

दरम्यान, सोनुर्ली व सातार्डा येथील दोन घटना वगळता इतर ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सोनुर्ली मतदान केंद्र क्र.१ वर बोगस मतदानाचा प्रकार रोखण्यात आला. संबधित बोगस मतदाराने आपली चुक कबूल केल्याने तसेच कोणाचीच याबाबत तक्रार नसल्याने अखेर या विषयावर पडदा टाकण्यात आला. तर सातार्डा येथे केंद्रलगतचे दुकाने बंद करायला लावल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली.

सावंतवाडी तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या मात्र तीन ग्रामपंचायती थेट बिनविरोध झाल्या तर सात ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले मात्र या ग्रामपंचायती या काही स्थानिक नेत्यांचे गड मानले जात आहेत. हे गड शाबूत राहण्यासाठी प्रत्येक नेत्याने चांगलीच कंबर कसलेली दिसून आली. यात बांदा, नेमळे,मडूरा, माडखोल, चराठा, माजगाव, कारीवडे, केसरी, सातार्डा या गावात चुरशीचे मतदान पाहायला मिळाले. प्रत्येक ग्रामपंचायतीचा टक्केवारी आकडा लक्षात घेता एकूण तालुक्यात इतके टक्के मतदान झाले. बाहेरील मतदार आणण्यासाठी प्रत्येकाने नियोजनबद्ध करण्यात येते वापरली बाहेरील मतदारामुळे आकडेवारी यावेळी वाढ दिसून आली.

 

तालुक्यात सकाळीच मतदानासाठी गर्दी झाली होती त्यानंतर दुपारी बारा वाजल्यावर मी गर्दी कमी झाली. मात्र, दुपारनंतर मतदारांनी पुन्हा मतदानासाठी गर्दी केली. यात पुरुष व महिला मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अनेक गावांमध्ये वयोवृद्ध मतदारांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला. यासाठी त्यांना राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील लोकांनी मदत केली. मदुरा येथे लग्नासाठी जाणाऱ्या नवरदेवाने लग्नाआधी येऊन आपला मतदानाचे कर्तव्य बजावले.

 

मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या एका तासानंतर काही मतदान केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बंद पडली. कलंबिस्त, सांगेली येथील मतदान केंद्रावर प्रभाग दोन मधील इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन तब्बल दोन ते अडीच तास बंद होती. सुमारे दोनशे मतदारांनी हक्क बजावल्यानंतर मशीनमध्ये मतदान प्रक्रिया होईना. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांची तारांबळ उडाली. त्यानंतर सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे कळविण्यात आल्यानंतर तब्बल दीड ते दोन तासानंतर दुसरी मशीन आणण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली.

तालुक्यात सात ते आठ गावांत इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन बिघाड होण्याचे प्रकार घडले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार यांनी तात्काळ इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन त्या त्या केंद्रावर नेऊन देण्याची व्यवस्था केल्यामुळे पुढील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

दरम्यान, सातार्डा देऊळवाडी येथील मतदान केंद्राबाहेर ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याने सायंकाळी उशिरा तेथील बाजारपेठ बंद करण्यात आली. सावंतवाडी उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी दोन तासासाठी हा निर्णय घेत २०० मीटरच्या आतील सर्व दुकाने बंद करण्यास भाग पाडली. या प्रकाराने तेथील व्यापार्‍यांनी व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गेली कित्येक वर्ष या ठिकाणी निवडणुका झाल्या परंतु असा प्रकार कधीच झाला नाही असे काहींनी सांगितले.

तर दुसरीकडे सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक एक येथे दुसऱ्या गावात ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व सोनुर्ली मध्ये मतदार यादीत नाव असलेल्या एका व्यक्तीने मतदान करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे असलेल्या एका पक्षाच्या पोलिंग एजंटने त्याला ओळखले व मतदानाचा हक्क बजावण्यास रोखून मतदान अधिकाऱ्यांकडे दाद मागितली.

 

एकूणच या प्रकारानंतर वातावरण तंग झाले मतदानाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात हा प्रकार घडल्याने काही वेळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. दरम्यान, हरकत घेतलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितावर कारवाईची मागणी केली. निर्णय अधिकाऱ्यांनीही हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगून दोन्हीकडे मतदान करता येत नसल्याचे सांगितले.

त्यानंतर मात्र घडलेल्या प्रकाराची संबंधित व्यक्तीने माफी मागितल्यानंतर हा प्रकार तडजोडीने मिटवण्यात आला. याबाबत तहसीलदार अरुण उंडे यांना विचारले असता झालेला प्रकार सत्य आहे परंतु संबंधित व्यक्तीने आपली चूक मान्य केली आणि कोणाचीही तक्रार नसल्याने यावर पडदा टाकण्यात आला. एका व्यक्तीला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही शिवाय तो व्यक्ती लोकप्रतिनिधी असल्याने त्याने स्वतः अशी चूक करू नये असे सांगितले.

Sindhudurg