लांजा नगरपंचायत निवडणूक, शुक्रवारी पाचव्या दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल

राजकीय पक्षांकडून अनास्था, पाचही उमेदवारी अर्ज अपक्षांचे

लांजा (प्रतिनिधी) लांजा न.पं. निवडणुकीत
शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये सर्वच्या सर्व उमेदवार हे अपक्ष असून राजकीय पक्षांकडून अद्यापही उमेदवारांची घोषणा केलेली नसल्याने पुढील दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत .
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर पासून असली तरी गुरुवारी चौथ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र आज शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ८ मध्ये दोन उमेदवार, प्रभाग क्रमांक १७ मध्ये दोन, प्रभाग क्रमांक १० मध्ये एक याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यापैकी प्रभाग क्रमांक आठ मधील एका उमेदवाराने दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आज पाचवा दिवस उजाडला तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडून अधिकृतपणे आपल्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अधिकृतपणे जाहीर केलेले नसल्याने पाचव्या दिवशीही अधिकृतपणे पक्षाचा एकही उमेदवार अर्ज दाखल झालेला नाही .
पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारी असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस बाकी शिल्लक असून पुढील तीनही दिवसात मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. किंबहुना उद्या शनिवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता असून तशी चिन्हे दिसून येत आहेत
दरम्यान आज पाचव्या दिवशी केवळ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.