देवरूख नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करा

आ. निरंजन डावखरे

देवरूख (प्रतिनिधी)

देवरूख नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने पक्षासाठी समर्पण करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांला न्याय देण्यासाठीच आहे. हे लक्षात घेवूनच भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय यांची महायुती म्हणूनच ही निवडणूक लढविली जात आहे. युती करताना सर्वच आपल्या मनाप्रमाणे होत नसते. त्यामुळे काहींवर अन्याय झाला असला तरी युती धर्म पाळला जाईल. तसेच या देवरुख नगरपंचायतीवर पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकविण्यासाठी मनभेद व मतभेद विसरून एकत्र येऊन काम करुन नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे कोकण निवडणूक प्रभारी व विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी देवरूख येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.

देवरूख नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठीच्या महायुतीच्या उमेदवार भाजपाच्या सौ. मृणाल अभिजित शेट्ये यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा शुभारंभ ग्रामदेवता सोळजाई देवी मंदिर येथे नारळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी चिपळूण संगमेश्वरचे आम. शेखर निकम, राजापूरचे आम. किरण सामंत, भाजपचे नेते प्रशांत यादव, निवडणूक समन्वयक अतुल काळसेकर, माजी आम. सुभाष बने शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, युवानेते रोहन बने, प्रमोद अधटराव, विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, राष्ट्रवादीेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, राजेंद्र सुर्वे. सौ. पुजा निकम आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत कोकणात महायुती करण्याची मुहूर्तमेढ उभारण्याचा मान देवरूख नगरपंचायत निवडणूकीत मिळाला असून हाच आदर्श सर्व कोकणात पाहायला मिळेल, असा विश्वास आम. शेखर निकम यांनी व्यक्त करत देवरूख नगरपंचायत निवडणूकीत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करतील, याची खात्री दिली.