माध्यमिक विद्यालय नाटळ मध्ये बालदिन उत्साहात साजरा

 

आजची मुले उद्याचा भारत घडवतील. आपण त्यांना कसे वाढवतो यावर देशाचे भवितव्य अवलंबून असते. 14 नोव्हेंबर अर्थात बाल दिन हा दिवस चाचा नेहरूंच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. माध्यमिक विद्यालय नाटळ येथे हा बालदिन एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ संचलित माध्यमिक विद्यालय नाटळ या प्रशालेमार्फत सौ. उमा भालचंद्र सावंत यांच्या संकल्पनेतून त्यांचे वडील कै. दिनकर बापू तावडे यांच्या स्मरणार्थ सवित्र बाल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सत्कारमूर्ती बालकांचा आदर्श ठेवून स्वतःलाही सिद्ध करावे या उदात्त हेतूने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य आहे. आपल्या जिल्ह्याला नवरत्नांच्या खाणींची उपमा दिली जाते. म्हणूनच आपल्या जिल्ह्यातील विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या पाच विद्यार्थ्यांना या बाल पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले.

यामध्ये विज्ञान क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग विज्ञान प्रतिकृतीद्वारे निर्माण करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला नावलौकिक प्राप्त करून देणारा श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे प्रशालेचा कु. सार्थक सतीशकुमार कर्ले याला गौरविण्यात आले.

फक्त कागद आणि रंगांची मैत्री मर्यादित न ठेवता रंगीत दोऱ्यांच्या विणकामातून पोट्रेट बनविणारी, रांगोळीच्या माध्यमातून व्यक्तिरेखा जिवंत करणारी, पर्यावरणाचा संदेश देत वाळू शिल्प साकारून राष्ट्रीय स्तरावर मजल मारणारी, पट्टशिल्पाची कलाकृती सादर करणारी अशी बहुविध कलांनी सर्वगुणसंपन्न कु. श्रेया समीर चांदरकर हिला गौरविण्यात आले.

सर्वच क्षेत्रात ज्याचा हातखंडा असून आपल्या अफाट बुद्धिमत्तेने अवाक करणारा, विविध देशांची राष्ट्रगीते विविध वादन साहित्यावर सादर करणारा, सर्व देशांच्या राजधान्या तोंडपाठ असणारा, सोबतच ११११ पर्यंत ज्याचे पाढे तोंडपाठ आहेत, जो उलट सुलट कशाही पद्धतीने उत्तम प्रकारे हार्मोनियम वादन करतो, ज्याने संगीतातील विविध उच्च स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविले आहे, ज्याला अवकाशाचे सखोल ज्ञान आहे असा मदर टेरेसा स्कूल वेंगुर्ला येथील बहुगुणसंपन्न विद्यार्थी कु.विजय दिनेश तुळसकर याला सन्मानित करण्यात आले.

शिक्षण विषयक विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम प्रकारे प्राविण्य प्राप्त करणारी, अभ्यासासोबतच वक्तृत्व, कला, क्रीडा या सर्वांमध्ये आपल्या हुशारीची चुणूक दाखविणारी, प्राप्त परिस्थितीवर मात करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारी माध्यमिक विद्यालय नाटळची विद्यार्थिनी कु. गार्गी संतोष सावंत हिला सन्मानित करण्यात आले.

विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या खेळाची राष्ट्रीय स्तरावर छाप पाडून आपल्या जिल्ह्याचे नाव उज्वल करणारी, राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक पटकावून जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली कनेडी ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. प्रज्योती श्रीकांत जाधव हिची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. तिच्या वतीने तिच्या आईने हा सन्मान स्वीकारला.

कु. सिद्धी झोरे हिने बालदिनाचे महत्त्व स्पष्ट करतआपले मनोगत व्यक्त केले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ ,शाल,श्रीफळ व रोख रक्कम रु. 1001 असे या पुरस्काराचे स्वरूप असून श्री. संजय वेतुरेकर ( कार्यवाह,शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य) या पुरस्कार सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले.पालकांमधून श्री. समीर चांदरकर व सौ. जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.संजय वेतुरेकर यांनी विद्यार्थ्यांना चौकस बुद्धी ठेवून मार्गक्रमण करण्याचा संदेश दिला. प्रमुख पाहुणे डॉ. हेमंत सावंत यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य कसे उत्तम प्रकारे राखावे याचे मार्गदर्शन केले.

या पुरस्काराचे खास वेगळेपण म्हणजे पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांची उत्तम कौशल्यपूर्ण मुलाखत प्रशाळेतीलच विद्यार्थ्यांनी घेत सर्व सत्कारमूर्तीची खास माहिती जाणून घेतली. सोबतच या पाचही विद्यार्थ्यांची विशेष कामगिरी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखविण्यात आली. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांनाही शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी संस्था अध्यक्ष श्री.भालचंद्र सावंत, शालेय समिती चेअरमन श्री. नितीन सावंत, खजिनदार श्री.शांताराम सावंत, सदस्य श्री. साबाजी सावंत, संस्था सदस्य श्री.सुरेश सावंत, लोकमत वार्ताहर श्री.मिलिंद डोंगरे, सिंधुदुर्ग लाईव्ह प्रतिनिधी साहिल बागवे, मुख्याध्यापिका सौ. प्रणिता तेली- बांबुळकर, सहा. शिक्षक दिनेश गावित, सुनिल मेस्त्री, सुरेश कोकणी, उज्वला पवार, तेजस्विनी सावंत, रामदास टारपे,मकरंद सावंत, वंदना वागतकर व सर्व विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश कोकणी व आभार प्रदर्शन श्री. सुनील मेस्त्री यांनी केले.