जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून लांजा पोलीस ठाण्याचा स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून गौरव 

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी स्विकारले प्रशस्तीपत्र 

संतोष कोत्रे  | लांजा :- पोलीस ठाण्याच्या परिसर स्वच्छतेसह करण्यात आलेले सुशोभीकरण, रंगरंगोटी, कामांचा निपटारा आणि इतर सर्वच दृष्टीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या हस्ते लांजा पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिस ठाण्याच्या परिसरात स्वच्छतेसह करण्यात आलेले सुशोभीकरण आणि रंगरंगोटीमुळे पोलिस ठाण्याचे रुपडे पालटले असून लक्षवेधी ठरली आहे. एकूणच लांजा पोलिस ठाण्याच्या इमारतीने कात टाकली आहे. महाराष्ट्र पोलीसांना दिलेल्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत लांजा पोलीस ठाण्याचा पूर्णपणे कायापालटच झाला आहे.

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी आपल्या सहकार्यांसह पोलीस ठाणे इमारतीला एक आकर्षक लूक प्राप्त करून दिला आहे. यामध्ये परिसर स्वच्छ करून इमारतीची रंगरंगोटी, माहिती फलक, जुन्या मुद्देमालाची निर्गती, नागरिकांचे अर्ज तत्काळ मार्गी लावणे, प्रतिबंधात्मक कारवाई ही कामे अधिकारी, अंमलदारांकडून करून घेत पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सात कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी केली आहे.

या एकूणच उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या हस्ते लांजा पोलीस ठाण्याचा स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी हे प्रशस्तीपत्र स्विकारले.