तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी यांचा पद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) याला जोरदार धक्का बसला असून पक्षाचे तालुकाध्यक्ष बापू जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी तसेच तालुका कार्यकारणी सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचे राजीनामा दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लांजा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहणारे अनंत उर्फ बापू जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष शमा थोडगे, महिला तालुकाध्यक्ष वैष्णवी बाईंग यांच्यासह पक्षाचे अन्य तालुका पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे आणि पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, पक्षनिरीक्षक बबन कनावजे यांच्याकडे सादर केले आहेत. तसेच इतर पदाधिकारी लवकरच राजीनामा देणार आहेत.
पक्षाचे काम निष्ठेने करत असताना देखील गेल्या दोन वर्षांपासून पक्षात आपली गळचेपि केली जात होती. कुठल्याही क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली नाही, अशी खंत बापू जाधव यांनी व्यक्त केली. जिल्हा बँक किंवा अन्य सहकारी संस्था या ठिकाणी संधी असतानाही ती मिळाली नाही, किंबहुना दिली गेली नाही असे बापू जाधव यांनी सांगितले.
पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील कोणत्या पक्षात जायचे किंवा काय याबाबत आपण चर्चा करून पुढील दिशा ठरविणार असल्याचे बापू जाधव यांनी सांगितले. दरम्यान, ऐन नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापू जाधव व पदाधिकारी यांच्या राजिनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे.












