रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील इयत्ता ११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्रातील काही मुलभूत संकल्पनांशी संबंधित प्रयोगांचे प्रदर्शन आणि भौतिकशास्त्रातील करीअरच्या संधींविषयीची मार्गदर्शनपर सत्रे ‘कम अँड लर्न फिजिक्स – अ फिजिक्स फेअर’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आली होती. सदर उपक्रम दि. ११ ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमांतर्गतील प्रदर्शनात इ. ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता त्यांच्याच अभ्यासक्रमातील उपयुक्त माहिती देणारे विविध प्रयोग मांडण्यात आले होते. यामध्ये ऊर्जा, ध्वनी, मोजमाप साधने, प्रकाश, प्रकाशाचे ध्रुवीकरण, प्रकाशाचे विवर्तन, दृश्यमान प्रकाश वर्णपट, विद्युत चुंबकीय परिणाम, पृष्ठताण, तरंग आणि अनुनाद, विद्युतधारा, खगोलशास्त्र तसेच संगणकावर आधारीत प्रयोगांचा आणि प्रतिकृतींचा समावेश होता. यांचा वापर संकल्पना स्पष्ट करण्यासाठी करण्यात आला. महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील साधारण ३५ विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रयोगांची मांडणी केली आणि सोप्या भाषेत त्यांतील वैज्ञानिक तत्त्वे प्रयोगांसह समजावून सांगितली.
या उपक्रमाचा रत्नागिरी शहरातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे संकल्पना समजावून घेण्याचा उपक्रम असल्याने सदर विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उस्फुर्तपणे आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.
भौतिकशास्त्रातील करीअरच्या संधींविषयीच्या मार्गदर्शनपर सत्रात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. महेश बेळेकर यांचे देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदर उपक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. भूषण ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला. उपक्रमाचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता असाच उपक्रम येत्या डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात पुन्हा आयोजित केला जाणार आहे आणि त्याचा लाभ इ. ११ वी आणि इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांतर्फे करण्यात आले आहे.












