रत्नागिरी:
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १९ ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला जारी केला आहे.
हवामानाचा अंदाज: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांमध्ये जिल्ह्यात पर्जन्यमान नसण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दिनांक १९ आणि २३ नोव्हेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ , तर २० ते २२ नोव्हेंबर रोजी मुख्यत्वे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या किमान तापमानात घट होत असल्यामुळे जनावरे व कोंबड्यांच्या निवाऱ्यात उबदार वातावरण राखण्याची व्यवस्था करावी, असा इशारा देण्यात आला आहे.
पिकांसाठी महत्त्वाचा सल्ला:
खरीप भात:
गरव्या जातींच्या भात पिकाची कापणी करताना विद्यापीठाने विकसित केलेला ‘वैभव विळा’ वापरावा.
कापणीनंतर शेतात ‘वाफसा’ स्थिती असल्यास लगेच नांगरट करावी, ज्यामुळे भाताची धसकटे मातीत मिसळतील आणि सुप्त अवस्थेतील खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होईल.
धान्य साठवणुकीसाठी कोरड्या बारदान्यांचा वापर करावा आणि कीड नियंत्रणासाठी कडुनिंबाची पाने किंवा निंबोळीचा चुरा धान्यात मिसळावा.
रब्बी पिके (वाल, कुळीथ, चवळी, मधुमका, मोहरी):
रब्बी पिकांची पूर्वमशागत, पेरणी तसेच रोपवाटिकेची तयारी जमिनीत वाफसा स्थिती असताना करावी.
पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बुरशीनाशकाची प्रक्रिया आणि रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करूनच पेरणी करावी.
वाल पिकासाठी विनामशागत पेरणी करताना, भात काढणीनंतर तणांचे नियंत्रण करण्यासाठी ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर करावा.
आंबा (वाढीची अवस्था):
नियमित मोहोर येण्यासाठी झाडाच्या बुंध्यालगतची जमीन झाडाच्या बुंध्यापासून सुमारे १.५० मीटर अंतरापर्यंत आणि १५-२० सें.मी. खोलीपर्यंत उकरून बेसिन एक्सपोजर ही प्रक्रिया करावी. यामुळे मोहोर येण्यासाठी आवश्यक असलेला ताण झाडाला मिळतो.
नवीन पालवीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डेल्टामेथ्रिन २.८% EC (९ मि.ली. प्रति १० लि. पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.
गॉल मिज (मिजमाशी) नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस ३६% एस.एल. (११ मि.ली. प्रति १० लि. पाण्यात) फवारणी करावी.
काजू (वाढीची अवस्था):
ढेकण्या (टी मोस्किटो बग) आणि फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% (६ मि.ली./१० लि. पाणी) किंवा प्रोफेनोफॉस ५०% (१० मि.ली./१० लि. पाणी) याची फवारणी करावी.
खोडकिडा (रोठा) याचा प्रादुर्भाव दिसल्यास प्रादुर्भावग्रस्त साल काढून, क्लोरोपायरीफॉस (५० मि.ली. १० लि. पाण्यात) या द्रावणाने तो भाग भिजवावा.
पशुपालन आणि कुक्कुटपालन:
किमान तापमानात घट होत असल्याने करड्यांचे (शेळीचे पिल्लू) थंडीपासून संरक्षण करण्यासाठी निवाऱ्यात उबदार वातावरण राखावे.
पायलाग (लाळ्या खुरकत) रोग किंवा लंपी त्वचारोग यांची लक्षणे दिसताच बाधित जनावरांना तत्काळ निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार व लसीकरण करावे.
रानीखेत रोगापासून संरक्षणासाठी ४ ते ७ दिवसांच्या ब्रॉयलर पक्ष्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लासोटा लस (एक थेंब नाकामध्ये/डोळ्यामध्ये) द्यावी.










