पाडकामाच्या ६ लाख ६१ हजार १५६ रुपयांच्या निविदेला स्थायी समितीची प्रशासकीय व आर्थिक मंजुरी
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषदेची ब्रिटिशकालीन जुनी ‘शेंगदाणा’ इमारत पाडण्याची कार्यवाही आता तातडीने केली जाणार आहे. या कामासाठी सादर करण्यात आलेल्या ६ लाख ६१ हजार १५६ रुपयांच्या निविदेला नगरपरिषदेच्या स्थायी समिती सभेत प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या जुन्या इमारतीच्या पाडकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगराध्यक्ष तथा स्थायी समितीचे सभापती उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नगर परिषदेची स्थायी समिती सभा सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात पार पडली. या सभेत विराज खेडेकर यांनी सादर केलेल्या ६ लाख ६१ हजार १५६ रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील विविध विकासकामांनाही मंजुरी देण्यात आल्याने या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. चिपळूण नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजासाठी सध्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन नगर परिषद इमारतीच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर जुन्या ब्रिटिशकालीन शेंगदाणा इमारतीचे पाडकाम महत्त्वाचे मानले जात आहे.
या सभेला मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, भाजपचे गटनेते शशिकांत मोदी, शिवसेनेचे गटनेते विकी नरळकर, आरोग्य सभापती शुभम पिसे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, शिक्षण सभापती हर्षाली पवार, नगरसेवक उदय जुवळे, महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.












