देवरूख (प्रतिनिधी):
कमी पावसामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा प्रशासनाकडून घेतला जात असताना, ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर ढिसाळपणा झाल्याचे विदारक वास्तव उघडकीस आले आहे.
टंचाई निवारणासाठी तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या तीन आढावा बैठकांमध्ये उपलब्ध पाण्याचे स्रोत, संभाव्य तीव्र टंचाईग्रस्त भाग, नव्या विंधन विहिरी आणि नालेबांधाऱ्यांचे नियोजन करण्यासोबतच जलजीवन मिशनच्या कामांची तपासणी करण्यात आली. यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या गटात जाऊन ग्रामसभांमधून गावागावांतील प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली असता, ग्रामस्थांनी या योजनांच्या अत्यंत निकृष्ट दर्जाबाबत गंभीर तक्रारींचा पाढा वाचला. ग्रामसभांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, शासकीय अंदाजपत्रकात विहिरींची खोली साधारण १० मीटर खोदण्याचे स्पष्ट नमूद असतानाही अनेक ठिकाणी ठेकेदारांनी विहिरींची खोली मनमानी पद्धतीने कमी ठेवली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, निकृष्ट आणि चुकीच्या बांधकामामुळे अनेक गावांत विहिरी बांधून पूर्ण होताच त्यांचे मूळ पाण्याचे झरेच आटल्याचे ग्रामस्थांनी उघड केले. कोट्यवधी रुपयांची कामे एकाच ठेकेदाराला बहाल करण्यात आल्याने कामांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, तर दुसरीकडे निधीअभावी उर्वरित कामे रखडल्याची सबब ठेकेदार पुढे करत आहेत. सुमारे दोन कोटींच्या घरात खर्च झालेल्या या योजनांची भयावह स्थिती पाहता, पूर्वीच्या अयशस्वी ‘जलस्वराज्य’ योजनेप्रमाणेच कोट्यवधींचा निधी पाण्यात जाण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या गैरप्रकारांविषयी पाणीपुरवठा विभागाकडे रीतसर तक्रारी करूनही संबंधित अधिकारी त्याची कोणतीही दखल घेत नसल्याने, संगमेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या या निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.













