रत्नागिरी नगर पालिका निवडणूक: छाननीनंतर एक नगराध्यक्ष, दहा नगरसेवक अर्ज अवैध

रिंगणात नगराध्यक्षपदासाठी 6 तर नगरसेवकपदासाठी 122 उमेदवार 
केतन उमेश शेट्ये यांचा अर्ज ठरला वैध

रत्नागिरी । प्रतिनिधी:

रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी छाननी केली. या छाननी प्रक्रियेत अर्धवट माहिती भरल्यामुळे एक नगराध्यक्षपदाचा अर्ज आणि दहा नगरसेवकपदाचे अर्ज अवैध ठरवण्यात आले.

मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत चाललेल्या या छाननीमध्ये काही अर्ज अवैध ठरले, तर दोन अर्जांवर आक्षेप नोंदवण्यात आल्याने त्यावर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर केतन शेट्ये आणि फरजाना मस्तान यांचे अर्ज वैध ठरले.

प्रभाग 4 ब मधील उमेदवार केतन उमेश शेट्ये यांच्या विरोधात मालमत्ता कर भरला नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता, ज्यासाठी 8 नोव्हेंबरच्या नगर पालिकेच्या नोटीसचा आधार घेण्यात आला होता. शेट्ये यांच्या वतीने ॲड. हर्षवर्धन गवाणकर यांनी बाजू मांडताना नोटीस मिळाल्यानंतर मालमत्ता कर भरल्याची आणि नगर पालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याची कागदपत्रे सादर केली. या पुराव्यांवर आधारित निर्णयानुसार केतन शेट्ये यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. तसेच, महिला उमेदवार फरजाना इरफान मस्तान यांच्या अर्जावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता, परंतु सायंकाळी उशिरा त्यांचा अर्जही वैध ठरवण्यात आला.

छाननी प्रक्रियेनंतर नगराध्यक्षपदासाठी सहा अर्ज आणि नगरसेवकपदासाठी 122 अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे.