लांजा (प्रतिनिधी): लांजा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या ७ अर्जांपैकी १ अर्ज
छाननीत अवैध ठरविण्यात आला आहे. तर नगरसेवक पदासाठीच्या १२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
लांजा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवारांचे तर नगरसेवक पदासाठीच्या १७ प्रभागातील १७ जागांसाठी ८० उमेदवारानी अर्ज दाखल केले होते. आज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या छाननीत नगराध्यक्षपदासाठी भाजपा पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रियांका संजय यादव यांचा अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने
रद्द करण्यात आला. मात्र त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे नगरसेवक पदाचे १७ जागांसाठी ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १२ उमेदवारी अर्ज छाननीत बाद करण्यात आले. यामध्ये
त्यामध्ये प्रभाग २ ओंकार आंब्रे यांनी भाजपा पक्षामार्फत दाखल केलेल्या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉम न जोडल्याने तो अवैध ठरविण्यात आला. मात्र त्यांचा अपक्ष अर्ज वैध धरण्यात आला आहे. तर प्रभाग क्र. ३ मधून श्वेता तरळ यांचा अर्ज देखील पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आला. तर प्रभाग ४ मधून अंजली कांबळे, यांचा भाजपा पक्षाचा अर्ज बाद ठरविण्यात आला. तर प्रभाग ६ मधून प्रमोद कुरूप, प्रभाग ७ मधून शितल सावंत, प्रभाग १० मधून मेघा लांजेकर, तसेच अवंतिका सावंत, किशोर यादव यांनी भाजपा पक्षाकडून अर्ज दाखल केला होता मात्र एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. मात्र त्यांचे अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ८ मधून मंगेश लांजेकर व मिलिंद लांजेकर तसेच प्रभाग १० मधून मधूरा लांजेकर यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने तेअवैध ठरविण्यात आले. मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. अशा प्रकारे लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील एक व नगरसेवक पदाचे १२ असे १३ अर्ज अवैध ठरले आहेत.
आता या निवडणुकीसाठी २१ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत असून त्यानंतरच निवडणुकीचे लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.













