रोटरी स्कूलमध्ये ‘कलाविष्कार आणि आस्वाद’ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी ‘कलाविष्कार आणि आस्वाद’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणून प्राचार्य कृष्णाजी कुलकर्णी यांनी उपस्थित राहून ज्ञानमय विचारांची पर्वणी घडवून आणली.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन  बिपीनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक श्री. राकेश आंबेरकर, समर्थ ग्रंथालय मुरडेचे अध्यक्ष श्री. शशांक सिनकर, सचिव श्री. श्यामसुंदर दळवी तसेच उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल हे मान्यवर उपस्थित होते. चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे यांनी व्याख्याते व सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.
आपल्या मनोगतात श्री. कृष्णाजी कुलकर्णी यांनी संत साहित्य, मराठी संस्कृती आणि मातृभाषेचे महत्व प्रभावी शब्दांत उलगडून सांगितले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत वाचनसंस्कृतीची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. “विद्यार्थ्यांनी मनापासून वाचनाची सवय जोपासली पाहिजे. आत्मविश्वास, विचार करण्याची क्षमता आणि नवीन कल्पनांचा शोध घेण्याची वृत्ती ही आजच्या शिक्षणाची गरज आहे,” असे ते म्हणाले. पालकांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी सांगितले की, मुलांच्या बौद्धिक विकासात पालक सर्वात महत्त्वाचा वाटा उचलतात. पालकांनी मुलांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केले पाहिजे. चर्चेला वेळ दिल्यास मुलांची विश्लेषणात्मक क्षमता, समस्या सोडविण्याची ताकद आणि जिज्ञासा अधिक वृद्धिंगत होते, असे ते म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान खेड तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने श्री. राकेश आंबेरकर यांच्या हस्ते व्याख्याते श्री. कृष्णाजी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन कु. शर्वरी सावर्डेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. बाळासाहेब राऊत यांनी केले. रोटरी स्कूलमध्ये आयोजित हा ज्ञानसमृद्ध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी तसेच उपस्थित पालक व मान्यवरांसाठी प्रेरणादायी ठरला.