राठीवडे परिसरात फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका

वनविभागाची तत्पर कारवाई

कुडाळ :-

धामापूर हद्दीतील राठीवडे (भाकरदेव) परिसरातील मालकीच्या जंगल भागात बिबट्या फासकीत अडकल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ श्री. सुभाष तळवडेकर यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, जलद बचाव पथक (RRT) तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुरक्षित सुटका करण्यात आली. त्यानंतर बिबट्याला सुरक्षिततेसाठी पिंजऱ्यात ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बिबट्याची प्रकृती पूर्णतः सुस्थितीत असल्याचे आढळून आले. तपासणीनंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

वनविभागाने सांगितले की, बिबट हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत बिबट्याची शिकार करणे किंवा त्याचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा असून आरोपीस द्रव्यदंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणातील आरोपीबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून त्यांना रोख बक्षीस देण्यात येईल, असेही विभागाकडून कळविण्यात आले.

सदर बचावकार्य मा. मिलीश दत्त शर्मा (उपवनसंरक्षक, सावंतवाडी) व डॉ. सुनील लाड (सहायक वनसंरक्षक, सावंतवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले. या मोहिमेत

वनक्षेत्रपाल कुडाळ – संदीप कुंभार, वनपाल मालवण – सदानंद परब, वनपाल नेरूर – सुर्यकांत सावंत

वनरक्षक धामापूर – अतुल खोत,

वनरक्षक कांदळगाव – लक्ष्मण आमले, वनरक्षक नेरूर – सचिन पाटील,वाहन चालक – राहुल मयेकर,RRT सदस्य – अनिल गावडे, दिवाकर बांबरर्डेकर, सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे (कुडाळ)

तसेच राठीवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सदर कारवाईमुळे एक बिबट सुरक्षितपणे वाचविण्यात वनविभागाला यश आले.