खेड नगरपरिषद निवडणूक महायुतीच म्हणून लढणार; वैभव खेडेकर यांनी घेतली शिवसेना नेते रामदासभाई कदम यांची भेट

खेड : – खेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले होते. विविध राजकीय पक्षांतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू असताना, युतीतील प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती आणि त्यानंतरच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणे चांगलीच रंग बदलताना दिसत होती.
महाराष्ट्रातील महायुतीचा पहिलाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज देखील खेड नगरपरिषदेसाठी दाखल झाला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे माध्यमांशी बोलताना हा अर्ज खेडमध्ये भरणार असल्याचे जाहीरही केले होते. अर्ज दाखल करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची उपस्थिती होती; मात्र भाजपचे प्रमुख नेतृत्व असलेले वैभव खेडेकर मात्र या प्रक्रियेदरम्यान हजर नसल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी वैभव खेडेकर यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह युतीच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली. या भेटीनंतर खेडमध्ये होणारी निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. शहरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना या भेटीने पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रथमच युतीच्या कार्यालयात दाखल होत खेडेकर यांनी शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे आता खेड शहरातील लढत ‘शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गट’ अशी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येण्याची शक्यता असल्याने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवारामध्ये चुरस रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
दरम्यान, वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते—एक भारतीय जनता पक्षाच्या नावाने तर दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून. मात्र छाननीदरम्यान त्यांचा भाजपकडून भरलेला अर्ज अवैध ठरला असून अपक्ष उमेदवारी वैध घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे वैभव खेडेकर कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. पण आज शिवसेना नेत्यांची घेतलेली भेट हा राजकीय कोडे सोडवणारा ठरला आहे. महायुतीला खेड नगरपालिकेतून तीन जागा मिळाल्याचेही वैभव खेडेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. नगराध्यक्षपद आणि सदस्यपदांसाठी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आता पूर्ण झाली असून अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत खेडच्या राजकारणात आणखी काही नाट्यमय हालचाली दिसून येतील का, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आजच्या या महत्त्वपूर्ण भेटीमुळे महायुतीचा खेड नगरपरिषदेवरील विजय निश्चित झाला असून, आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवा खेड नगरपालिकेवर फडकण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा शहरभर रंगल्या आहेत. यावेळी शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह खेड तालुका व शहर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.